बुलडाण्यात वैद्यकीय महाविद्यालय; तीन सदस्यीय समिती सकारात्मक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2018 06:34 PM2018-06-23T18:34:30+5:302018-06-23T18:36:16+5:30
बुलडाणा : जिल्हा मुख्यालयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासंदर्भातील निकषांची तपासणी करण्यासाठी आलेल्या तीन सदस्यीय समितीने २० जून रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला सकारात्मक अहवाल सादर केला आहे.
- नीलेश जोशी
बुलडाणा : जिल्हा मुख्यालयी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यासंदर्भातील निकषांची तपासणी करण्यासाठी आलेल्या तीन सदस्यीय समितीने २० जून रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला सकारात्मक अहवाल सादर केला आहे. दीडशे विद्यार्थी संख्या असणारे हे महाविद्यालय राहणार आहे.दरम्यान, शहरातील तीन जागांची पाहणी करण्यात आलेली असतानाच क्षय आरोग्य धाम येथील जागा ही या महाविद्यालयासाठी उपयुक्त असल्याचेही समितीने सादर केलेल्या अहवालात स्पष्ट केले आहे. वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भाती प्रमुख निकषांपैकी असलेले दोन अडथळे पूर्णत: निकाली निघाले आहे. त्यानुषंगने भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने घालून दिलेल्या निकषांचीत तपासणी करण्यासाठी तीन सदस्यीय समिती औरंगाबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यक विभागाचे प्रमुख डॉ. कैलास झीने यांच्या अध्यक्षतेखाली गठीत करण्यात आली होती. दरम्यान, याच महाविद्यालयातील शरीर रचना शास्त्र विभागाचे डॉ. शिवाजी सुकरे आणि औषध शास्त्र विभागाचे डॉ. मिर्झा शिराज बेग यांचा समितीमध्ये समावेश होता. बुलडाणा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला तत्वत: मान्यता दिल्या गेली होती. बुलडाण्याचे आ. हर्षवर्धन सपकाळ यांनी विधीमंडळात त्यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा केला होता. सोबतच २२ मे रोजी बुलडाणा जिल्ह्यातील महत्त्वाच्या प्रश्नासंदर्भात मुख्यमंत्र्यांचे अपर सचिव प्रवीण परदेशी यांनी मुंबई मंत्रालयातील दालनात बैठक घेऊन या मुद्द्यावर व्हीसीद्वारे चर्चा ही केली होती. त्यानंतर ही समिती गठीत करण्यात येऊन निकषांची तपासणी करून १५ दिवसांच्या आत वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला अहवाल सादर करायचा होता. त्यानुषंगाने समितीने बुलडाणा येथे दोन आठवड्याआधी येऊन पाहणी केली.
२० जूनला अहवाल सादर
डॉ. कैलास झीने यांच्या अध्यक्षतेखाली गठीत तीन सदस्यीय समितीने २० जून रोजी वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाला बुलडाण्यातील वैद्यकीय महाविद्यालयासंदर्भातील सकारात्क प्रस्ताव पाठविला असल्याची माहिती उच्चपदस्थ सुत्रांनी दिली. वैद्यकीय महाविद्यालयासाठी किमान २० ते २५ एक्कर जमीन आणि किमान ३०० खाटांचे रुग्णालय आवश्यक आहे. या दोन्ही प्रमुख निकषात बुलडाणा बसले आहे. त्यामुळे आता छोट्यामोठ्या अडचणीही दुर करण्यास प्रशासकीय पातळीवर महत्त्व देणे गरजेचे आहे.
क्षय आरोग्य धाम
उपयुक्त समितीने बुलडाण्यालगतच्या हतेडी येथील जागा, बोथा मार्गावरील जागा आणि क्षय आरोग्य धामची जागा अपर जिल्हाधिकारी प्रविणसिंह दुबे यांच्या सह जाऊन बघितली होती. त्यापैकी हतेडीची जागा १२ किलोमीटर लांब आहे. खामगाव मार्गावरील (बोथा रोड) ही जागा मोठी असली तरी लगतच्या परिसरात खदानी असल्याने या जागेची समस्या आहे. सर्वंकष बाजूने विचार करता क्षय आरोग्य धाम येथील जागा वैद्यकीय महाविद्यालयाच्या दृष्टीे उपयुक्त असल्याचा निष्कर्ष समितीने काठला आहे. १५० विद्यार्थी संख्या असणारे हे महाविद्यालय राहणार असून विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह आणि स्टापसाठी कॉर्टर या दोन्ही बाबींची पुर्ततेच्या दृष्टीने प्रयत्न अपेक्षीत आहेत.