मातृतीर्थाच्या विकासासाठी मुख्यमंत्र्यांना भेटणार
By Admin | Published: November 17, 2014 12:38 AM2014-11-17T00:38:42+5:302014-11-17T00:38:42+5:30
सर्वांगीण विकासासोबत पाताळगंगा नदीचे रुंदीकरण करण्याची देखील मागणी.
सिंदखेडराजा (बुलडाणा) : मातृतीर्थ सिंदखेडराजा शहराच्या विकासासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी २५0 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. मातृतिर्थ विकास प्राधिकरणाला गती देण्यासाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यात येईल, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अँड. नाझेर काझी यांनी दिली. ते स्थानिक विश्रामगृहावर रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
ऐतिहासिक शहराच्या सर्वांंगीण विकासासाठी गत ३0 वर्षांंपूर्वी १00 कोटी रुपयांचा विकास आराखडा मुकुल वासनिक यांनी शासनाला सादर केला होता. त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री अजीत पवार यांनी विकास प्राधिकरणाची घोषणा केली. त्यासाठी २५0 कोटी रुपये निधीही मंजूर केला होता. शहराच्या सर्वांंगीण विकास प्राधिकरणाच्या कामासाठी जिल्हाधिकार्यांनी प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा मागितल्या होत्या. शहराच्या सर्वांंगीण विकास प्राधिकरणासोबत पाताळगंगा नदीचे रुंदीकरण करून खोलीकरण तसेच बंधारे बांधून सिंचनाची सुविधा अशा विविध विकासात्मक कामाला प्रत्यक्षात सुरुवात करण्याच्या दृष्टीने डॉ. राजेंद्र शिंगणे, हसन मुश्रीफ व स्थानिक पदाधिकार्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही अँड. काझी यांनी यावेळी सांगितले. यावेळी देविदास ठाकरे, डॉ. मुरलीधर शेवाळे, के. टी. ठाकरे, भगवान सातपुते, जगन सहाणे, गफ्फारभाई, अँड. संदीप मेहेत्रे आदी उपस्थित होते.