वर्षातून आठ वेळा होणार निराधार योजनेची बैठक!
By admin | Published: August 10, 2015 11:33 PM2015-08-10T23:33:55+5:302015-08-10T23:33:55+5:30
सामाजिक न्याय विभागाने दिले आदेश.
बुलडाणा : संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना लाभ मिळण्यासाठी यापुढे निराधार समितीच्या किमान आठ बैठकी वर्षभरात ठरवून दिलेल्या तारखेला घेण्याचे आदेश सामाजिक न्याय विभागाने दिले आहेत. त्यामुळे प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्यासाठी मदत होणार आहे. संजय गांधी निराधार योजनेतून निराधार व्यक्तींना दरमहा निश्चित वेतन देण्यात येते; मात्र या योजनेतून लाभार्थ्यांना अर्ज केल्यानंतर दोन-दोन वर्षानंतरही लाभ मिळत नसल्याच्या तक्रारी प्रत्येक तहसील कार्यालयात दाखल होत आहेत. दाखल होत असलेल्या तक्रारींचे निरसन करण्यासाठी तसेच प्रलंबित प्रकरणांचा निपटारा होण्याच्या दृष्टिकोनातून सामाजिक न्याय विभागाने ४ ऑगस्ट रोजी नवा निर्णय घेऊन मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यापुढे वर्षभरात निराधार समितीच्या आठ बैठकी निश्चित केलेल्या तारखेच्या दिवशी घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती (३ जानेवारी), सावित्रीबाई फुले पुण्यतिथी (१0 मार्च), महात्मा ज्योतीबा फुले जयंती व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (११ ते १४ एप्रिल), रमाबाई आंबेडकर यांची पुण्यतिथी (२७ मे), राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचा जन्मदिवस (२६ जून), स्वातंत्र्यदिन (१५ ऑगस्ट), महात्मा गांधी जयंती (२ ऑक्टोबर) व डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन (६ डिसेंबर) यांचा यामध्ये समावेश आहे. सदर जाहीर केलेल्या तारखेच्या दिवशी शासकीय सुट्टी किंवा अन्य रजा येत असल्यास या तारखेच्या पूर्वीच्या किंवा नंतरच्या तीन दिवसांची तारीख निश्चित करण्याचे आदेशात नमूद केले आहे तसेच संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष बैठकीस गैरहजर राहिल्यास किंवा उपस्थिती दर्शविण्यास असर्मथता दाखविल्यास तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समितीच्या बैठका घेण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत.