अंत्यविधीसाठी पोलिस ठाण्यात घ्यावी लागली बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 10:59 AM2020-07-20T10:59:54+5:302020-07-20T11:00:05+5:30
चक्क दोन तास झालेल्या बैठकीत आपसी शाब्दीक वादही झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : जोहर नगरमध्ये कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याच्या विरोधाचा मुद्दा पुन्हा पोलिस ठाण्यात पोहोचला. येथे चक्क दोन तास झालेल्या बैठकीत आपसी शाब्दीक वादही झाले.
त्यानंतर आलटून पालटून जोहर नगर व संगम तलाव स्थित स्मशानभूमीत कोरोनामुळे मृत्यू झालेल्या तथा नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारण्यास नकार दिलेल्या मृत व्यक्तींच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय शिवसेना,भाजपच्या नगरसेवकांसह नगराध्यक्षांचे पती मोहमंद सज्जाद यांच्यात आपसात झाला व गुळभेली येथील मृत व्यक्तीचे पार्थिव संगम तलावस्थित स्मशानभूमीत नेण्यात आले. तेथेही सकाळपासूनच पालिकेचे चार कर्मचारी पीपीई किट घालून पार्थिव अंत्यविधीसाठी कधी येते याची वाट पाहत होते.
पोलिस ठाण्यातील शाब्दीक चकमक व अधिकाऱ्यांच्या मध्यस्तीनंतर तुर्तास हा प्रश्न निकाली निघाला असला तरी येत्या काळात जिल्ह्यात कोरोना संसर्गाची वाढती व्याप्ती व त्याच्या तुलनेच जवळपास तीन टक्के होणारे मृत्यू पाहता भविष्यात हा मुद्दा चांगलाच चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
खुद्द उपविभागीय अधिकारी राजेश्वर हांडे, एसडीपीओ रमेश बरकते, तहसिलदार संतोष शिंदे, ठाणेदार प्रदीप सोळंकी यांच्या उपस्थितीत हा काथ्याकूट झाला.
यावेळी प्रशासनाने पालिका उपाध्यक्ष विजय जायभाये, गटनेते अशोक इंगळे, नगरसेवक अरविंद होंडे, बाहेकर आणि जोहेरनगरमधील स्मशानभूमीत कोरोना अंत्यविधीसाठी विरोध मोहम्मद सज्जाद यांना आपसातच सामंजस्याने निर्णय घेण्याचे सोडले होते. त्यात हा सुवर्ण मध्य निघाला. मात्र प्रशासना जो निर्णय घेईल हे सर्वांसाठी बंधनकारक राहील, हे बजावण्यासही उपविभागीय ््अधिकारी राजेश्वर हांडे यांनी बजावले आहे. तुर्तास प्रकरण शांततेत मिटले असले तरी प्रशासनाने काही बाबी प्रोसेडींगवर घेतल्यास अंत्यसंस्काराच्या मुद्द्यावर सुरू असलेल्या या राजकारणात काहींची चांगलीच गोची होण्याची शक्यता नाकारता येत नाही.