मेहकर : लोणी गवळी येथील कर्मचार्यांना मुख्यालयाची अँलर्जी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2017 00:24 IST2017-12-19T23:58:59+5:302017-12-20T00:24:15+5:30
मेहकर: तालुक्यातील लोणीगवळी येथे येणारे विविध शासकीय कर्मचारी दररोज बाहेरगावावरून येणे-जाणे करतात. त्यामुळे कामावर परिणाम होत असून, याची चौकशी करून सदर कर्मचार्यावर कारवाई करावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव वानखेडेसह कार्यकर्त्यांनी १९ डिसेंबर रोजी दिला आहे.

मेहकर : लोणी गवळी येथील कर्मचार्यांना मुख्यालयाची अँलर्जी!
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर: तालुक्यातील लोणीगवळी येथे येणारे विविध शासकीय कर्मचारी दररोज बाहेरगावावरून येणे-जाणे करतात. त्यामुळे कामावर परिणाम होत असून, याची चौकशी करून सदर कर्मचार्यावर कारवाई करावी, अन्यथा पंचायत समितीसमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष माधवराव वानखेडेसह कार्यकर्त्यांनी १९ डिसेंबर रोजी दिला आहे.
तालुक्यातील लोणीगवळी येथे विविध शासकीय कार्यालये आहेत. या ठिकाणी ग्रामसेवक, पशुवैद्यकीय अधिकारी, लाइनमन, तलाठी जि.प शाळेचे शिक्षक, कृषी सहायक यासह इतरही कर्मचारी दररोज बाहेरगावावरून येणे-जाणे करतात. सततच्या बाहेर गावावरून येण्या-जाण्यामुळे गावातील विविध विकासकामांवर याचा परिणाम होत आहे.
तसेच गावातील अनेक विकासाची कामे खोळंबली आहेत. काही नागरिकांना या अधिकार्यांच्या मागे फिरावे लागते.
सदर कर्मचार्यांनी मुख्यालयी राहावे, असे निर्देश असतानाही कर्मचारी मुख्यालयी राहत नाहीत. अनेक कर्मचार्यांनी गावातून स्टॅम्प पेपरवर भाडेपट्टे करून घेतले आहेत.
सदर भाडेपट्टय़ाची चौकशी करावी व संबंधित कर्मचार्यांना लोणी गवळी येथे मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अन्यथा ३0 डिसेंबर रोजी पंचायत समिती मेहकरच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात येईल, असा इशारा राष्ट्रवादी किसान सेना जिल्हा उपाध्यक्ष माधव सखाराम वानखेडे, आरपीआय तालुका कार्याध्यक्ष देवीदास गोविंदराव खंडारे, भास्कर बाजीराव खंडारे, रमेश वानखेडे, भास्कर गवळी, राजेश नवले, सोपान कंकाळ, किसन इंगळे, दत्तात्रय जाधव, डॉ. श्रीराम मेहेत्रे, रामभाऊ कदम, वसंत खंडारे, दीपक गवळी आदींनी दिला आहे.
रोहयोची कामे मजुरांना द्या!
लोणी गवळीसह वरुड, आंधृड, भोसा, उमरा देशमुख या परिसरात रोजगार हमीची कामे ही मजुरांमार्फत होत नाहीत. त्यामुळे दुष्काळसदृश परिस्थितीत मजुरांवर उपासमारीची पाळी येते. रोजगार हमींची कामे मजुरामार्फतच करावी, असे शासनाचे निर्देश असतानाही या परिसरातील कामे जेसीबी मशीनच्या साहाय्याने करण्यात येतात. अनेक गरीब मजुरांकडून कागदपत्रे घेऊन कामाचे मस्टर भरून घेण्यात येते. यामुळे खर्या मजुरांना कामे मिळत नाहीत. त्यामुळे रोजगार हमीची कामे मजुरांमार्फतच करण्यात यावी, अशी मागणी आरपीआय मेहकरचे तालुका कार्याध्यक्ष, देवीदास गोविंद खंडारे, माधव वानखेडे, जगदीश अवचार आदींनी केली आहे.