मेहकर पंचायत समिती सभापतींचा राजीनामा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:35 AM2021-04-20T04:35:54+5:302021-04-20T04:35:54+5:30
मेहकर : खा. जाधव व आ. रायमुलकर यांचे विश्वासू व निकटवर्तीय समजले जाणारे निंबाजी श्रीराम पांडव यांनी मेहकर पंचायत ...
मेहकर : खा. जाधव व आ. रायमुलकर यांचे विश्वासू व निकटवर्तीय समजले जाणारे निंबाजी श्रीराम पांडव यांनी मेहकर पंचायत समिती सभापतिपदाचा राजीनामा सोमवारी जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्याकडे सादर केला आहे.
मागील निवडणौकीत अकरापैकी शिवसेनेला नऊ, काँग्रेसला दोन तर भाजपाला एक जागा मिळाली होती. यावेळी सभापतिपदाचा मान जयाताई खंडारे, प्रतिमाताई वानखेडे यांना देण्यात आला होता. त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर खा. जाधव व आ. रायमुलकर यांनी सभापतिपदाची माळ निंबाजी श्रीराम पांडव यांच्या गळ्यात घातली. तेव्हापासून पंचायत समितीचे सर्व कारभार अगदी चोखपणे सांभाळत असताना त्यांनी अचानकपणे राजीनामा जिल्हा परिषद अध्यक्षा यांच्याकडे सादर केल्याने पंचायत समिती वर्तुळात चर्चा रंगली आहे.
कोटः मी माझ्या वैयक्तिक अडचणींमुळे मेहकर पंचायत समिती सभापतिपदाचा राजीनामा मंजुरीसाठी जि. प़ अध्यक्षा यांच्याकडे सादर केला आहे.
-निंबाजी श्रीराम पांडव, सभापती,पं. स़ मेहकर
सभापतिपदासाठी चुरस
शिवसेनेकडून नऊपैकी दोन महिला व एक पुरुष यांनी सभापतिपदाचा कारभार बघितला. आता राजीनामा मंजुरीनंतर सभापतिपदी कुणाची वर्णी लागते याकडे सर्वाचे लक्ष आहे. यामध्ये महिला सभापती म्हणून नीता देशमुख, वर्षाताई मवाळ व मीनाताई म्हस्के यांची वर्णी लागू शकते. त्यातल्या त्यात निकटवर्तीय म्हणून सभापतिपदी निता दि. देशमुख यांची शक्यता जास्त आहे. शेवटी राजकारणात खा. जाधव व आ. रायमुलकर हे निष्णात आहेत.