मेहकर तालुक्यात १९ हजार कुटूंब शौचालयापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 1, 2017 01:08 PM2017-11-01T13:08:52+5:302017-11-01T13:09:18+5:30
मेहकर : तालुक्यातील प्रत्येक गाव हागणदारीमुक्त व्हावे यासाठी पंचायत समिती स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. डिसेंबर २०१७ च्या अखेरपर्यंत संपूर्ण मेहकर तालुका हागणदारीमुक्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
मेहकर : तालुक्यातील प्रत्येक गाव हागणदारीमुक्त व्हावे यासाठी पंचायत समिती स्तरावरुन प्रयत्न सुरु आहेत. डिसेंबर २०१७ च्या अखेरपर्यंत संपूर्ण मेहकर तालुका हागणदारीमुक्त करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. परंतु अद्यापही मेहकर तालुक्यात १९ हजार कुटूंब शौचालय बांधकामापासून वंचित आहेत. प्रत्येक कुटूंबाने शौचालय बांधकाम करुन त्याचा नियमीत वापर करावा यासाठी पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी यांचे युद्ध पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. तर ज्या लोकांनी शौचालय बांधकाम पुर्ण केले आहेत ते लोक मात्र अनुदान मिळविण्यासाठी दररोज पंचायत समितीकडे चकरा मारत आहेत.
स्वच्छ भारत मिशन अंतर्गत प्रत्येक खेडेगावातील प्रत्येक कुटूंबाने शौचालय बांधून त्याचा वापर केला पाहिजे, अशा शासनाच्या सक्त सुचना आहेत. डिसेंबर अखेर पर्यंत संपूर्ण मेहकर तालुका हागणदारी मुक्त झाला पाहिजे अशा वरिष्ठांच्या सुचना आहेत. अवघ्या दोन महिन्याचा कालावधी उरला असल्याने पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आर.पी.पवार, सहाय्यक गटविकास अधिकारी अशोक सानप, विस्तार अधिकारी शरद जाधव, प्रितम राजपूत, तालुका गटसमन्वयक डी.जे.मगर, टी.एल.धनवटे, एस.एस.गवळी हे प्रत्येक खेडेगावात जाऊन शौचालय बांधकाम पूर्ण करुन त्याचा नियमीत वापर करावा, यासाठी जनजागृती करीत आहेत. जनजागृतीसाठी कॉर्नर बैठका, गृहभेटी, संवाद बैठक, प्रभातफेरी, कलापथक गावात आॅटोद्वारे जनजागृती व शौचालयाचे महत्व सर्वसामान्यांना पटवून देत आहेत.
मेहकर तालुक्यात एकूण ४१ हजार २९६ कुटूंब संख्या आहे. त्यापैकी आतापर्यंत २२ हजार ४१५ कुटूंबाकडे शौचालयाचे बांधकाम पूर्ण झालेले आहेत. तर जवळपास १८ हजार ८८१ कुटूंब अजूनही शौचालय बांधकामापासून वंचित आहेत. ज्यांच्याकडे शौचालय नाही, अशा कुटूंबांना शौचालय बांधकामा संदर्भात परावृत्त करण्यात येत आहे. मेहकर तालुक्यात असलेल्या ९८ ग्रामपंचायत पैकी जवळपास १८ ग्रामपंचायत आतापर्यंत हागणदारीमुक्त करण्यासाठी अधिकारी व कर्मचाºयांचे प्रयत्न सुरु आहेत. (तालुका प्रतिनिधी)
शौचालय नसलेल्यांचे ग्रा.पं.ने लावले बोर्ड
प्रत्येक कुटंूबाने शौचालय बांधालेच पाहिजे, यासाठी वेळप्रसंगी सक्ती करण्यात येत आहे. शासनाच्या योजना, लाभ, दाखले, रेषेनचा माल आदींचा लाभ हा शौचालय नसल्यास त्या कुटूंबाला मिळणार नाही. तर प्रत्येकाने शौचालय बांधावे यासाठी सोनाटी व गजरखेड या ग्रा.पं.ने ज्यांच्याकडे शौचालय नाही, अशा लोकांची नावे बोर्डावर छापून दर्शनी भागात लावले आहेत.
लाभार्थ्याला तत्काळ अनुदान द्यावे
गाव हागणदारीमुक्त व्हावे, त्यामुळे आपलेच गाव परिसर स्वच्छ राहून नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी अनेकांनी शौचालय बांधकाम केले आहे. मात्र ज्या लोकांनी शौचालय बांधले आहे त्या लोकांना शासनाकडून अनुदान देण्यात येते. मात्र गेल्या दोन ते तीन महिन्यापासून अनुदान मिळण्यासाठी लाभार्थी पंचायत समितीकडे चकरा मारत आहेत. मात्र संबंधित कर्मचाºयांकडून अनुदान देण्यास टाळाटाळ करण्यात येत असल्याने अनुदान तात्काळ द्यावे, अन्यथा गटविकास अधिकारी यांना घेराव घालण्याचा इशारा जेष्ठ नेते मधुकरराव गवई यांनी दिला आहे.