मेहकर तालुका ; शौचालय अनुदानाचे ८ कोटी थकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2018 05:04 PM2018-05-23T17:04:37+5:302018-05-23T17:04:37+5:30
शौचालय बांधकाम पुर्ण होऊनही अनुदान मिळण्यासाठी लाभार्थी पंचायत समितीत चकरा मारत आहेत. शौचालय अनुदानाचे जवळपास ८ कोटी रूपये थकित असल्याने अनुदान वाटपास विलंब होत आहे.
मेहकर : स्वच्छ भारत मिशन अंतर्गत संपुर्ण मेहकर तालुका हागणदरीमुक्त करण्यासाठी पंचायत समिती स्तरावरून मोठा गाजावाजा करण्यात आला. ग्रामीण भागातील गोरगरीबांनी शौचालय सुध्दा बांधले. मात्र शौचालय बांधकाम पुर्ण होऊनही अनुदान मिळण्यासाठी लाभार्थी पंचायत समितीत चकरा मारत आहेत. शौचालय अनुदानाचे जवळपास ८ कोटी रूपये थकित असल्याने अनुदान वाटपास विलंब होत आहे. मेहकर तालुका हागणदारी मुक्त व्हावा, प्रत्येक गावात स्वच्छता राहावी, नागरिकांचे आरोग्य निरोगी रहावे यासाठी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत मेहकर पंचायत समिती स्तरावरून ग्रामीण भागात प्रत्येक कुटूंबाने शौचालय बांधले पाहिजे यासाठी वेगवेगळ्या मार्गाने जनजागृती केली. यामध्ये कलापथक, समाज प्रबोधन, प्रभात फेरी, गृहभेटी, कॉर्नर बैठका असे विविध उपक्रम राबविण्यात आले. तर काही गावात नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने काही निर्णय घेतले. ज्या कुटूंबाकडे शौचालय बांधकाम पुर्ण नसेल त्या कुटूंबाला राशनचे अन्नधान्य मिळणार नाही, शासनाच्या कोणत्याच योजनांचा लाभा मिळणार नाही, अशी सक्तीही करण्यात आली. अखेर नागरिकांकडून शौचालयाचे बांधकाम पुर्ण करून घेण्यास पंचायत समितीचे अधिकारी व कर्मचारी अयशस्वी झाले. त्यामुळे सन २०११ च्या सर्वेला अनुसरून मेहकर तालुका हागणदारी मुक्त झाल्याचे घोषीत करण्यात आले. मेहकर तालुक्यातील काही गावे वगळता इतर गावामध्ये शौचालय बांधकामाचे तिन तेरा वाजले आहेत. परंतु ज्या लोकांनी खरोखर शौचालयाचे बांधकाम करून त्याचा नियमित वापर करीत आहे. अशा लोकांना गेल्या तिन ते चार महिन्यापासून शौचालयाचे अनुदान मिळालेले नाही. अनुदान मिळण्यासाठी लाभार्थी दररोज पंचायत समितीला चकरा मारत आहेत. स्वच्छता अभियानाचे सबंधीत अधिकारी लाभार्थ्यांना दररोज उडवा-उडवीचे उत्तरे देतात. त्यामुळे लाभार्थी हैराण झाले आहेत. थकित असलेले अनुदान लवकरात लवकर वाटप करण्यात यावे. अशी मागणी श्रीकृष्ण घनवट यांनी केली आहे.
कर्मचारी करतात पैशाची मागणी-आरोप
परतापुर येथील ज्ञानदेव विठ्ठल जाधव यांनी शौचालयाचे बांधकाम पुर्ण केले आहे. शौचालयाचे अनुदान मिळण्यासाठी ज्ञानदेव जाधव हे गेल्या तिन महिन्यापासून पंचायत समितीला चकरा मारत आहेत. स्वच्छता अभियान कार्यालयातील कर्मचारी अनुदानासाठी पैशाची मागणी करतात. पैसे न दिल्यामुळे जाणीव पुर्वक अनुदान बॅकेमध्ये टाकण्यास टाळाटाळ करीत आहेत. व बॅक खाते क्रमांक चुकवित आहेत. असा आरोप ज्ञानदेव विठ्ठल जाधव यांनी केला आहे.
आतापर्यंत लाभार्थ्यांना १२ कोटी रूपये वाटप करण्यात आले आहे. अजुन ८ कोटी रूपये वाटप करणे बाकी आहे. ८ कोटी रूपये मिळण्यासाठी वरिष्ठांकडे मागणी केलेली आहे.
- अशोक सानप सहाय्यक गटविकास अधिकारी पं.स.मेहकर.