कोरोनात ड्युटी बजावलेल्या शिक्षकांचा मेहकरात सन्मान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:36 AM2021-07-27T04:36:10+5:302021-07-27T04:36:10+5:30
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेहकर पं.स. अंतर्गत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या शिक्षक बांधवांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्या ७ शिक्षकांना श्रद्धांजली ...
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मेहकर पं.स. अंतर्गत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ज्या शिक्षक बांधवांचा कोरोनामुळे मृत्यू झाला, त्या ७ शिक्षकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख प्रमोद रायमूलकर, प्रमुख अतिथी म्हणून शारंगधर बँकेचे संचालक निरज रायमूलकर, राज्य कार्यकारिणी सदस्य संजय दुणगू, विभागीय प्रसिद्धिप्रमुख प्रकाश सास्ते, जिल्हा सरचिटणीस सुनील मगर, जिल्हा उपाध्यक्ष पुरुषोत्तम आकोटकर उपस्थित होते.
कोरोनाच्या महाभयंकर लाटेत साधारणतः दोन महिने शिक्षकांची नियुक्ती पोलीसमित्र म्हणून संचारबंदी उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याकरिता करण्यात आली होती. मेहकर शहरातील विविध महत्त्वाच्या ठिकाणी पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून शिक्षकांनी समर्पित भावाने कर्तव्य पार पाडल्याबद्दल सद्भावना व्यक्त करून त्यांना कोविड योद्धा म्हणून सन्मानपत्र बहाल करण्यात आले. शिक्षक समिती तालुकाध्यक्ष राजेंद्र वाघ, सचिव हिरालाल डोंगरे यांच्या संकल्पनेतून पंचायत समिती मेहकर अंतर्गत ५३ शिक्षक योद्ध्यांचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन अनंत शेळके यांनी केले. प्रास्ताविक पुरुषोत्तम आकोटकर यांनी तर आभारप्रदर्शन गजानन सातपुते यांनी केले. शिक्षकमित्र राजू निकम, प्रवीण देशमुख, नंदकिशोर कुडके यांनी आपले अनुभव विशद केले. कार्यक्रम यशस्वितेसाठी तालुकाध्यक्ष राजेंद्र वाघ, सचिव हिरालाल डोंगरे, उपाध्यक्ष समाधान तोंडे, विलास लांभाडे, अनिल तुपकर, प्रमोद निंबेकर, अशोक ठाकरे, संतोष सावळकर यांनी परिश्रम घेतले.