मेहकरचे नगराध्यक्ष कासम गवळी अपात्र
By admin | Published: June 2, 2017 02:59 AM2017-06-02T02:59:42+5:302017-06-02T03:02:47+5:30
बहुचर्चित राजीव गांधी कॉम्प्लेक्स प्रकरण भोवले!
लोकमत न्यूज नेटवर्क
मेहकर : बहुचर्चित राजीव गांधी कॉम्प्लेक्स बांधकाम प्रकरणात नगराध्यक्ष कासम पिरु गवळी यांना गुरुवारी मुंबई येथे नगरविकास मंत्रालयाकडून अपात्र ठरविण्यात आले असून, या वृत्ताने शहरात खळबळ उडाली आहे. शिवसेनेने फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले आहे.
मेहकर नगरपालिकेने विकास आराखड्यातील आरक्षण क्र.१२ विकसित करण्यासाठी ‘बांधा, वापरा व हस्तांतरण करा’ तत्त्वावर भाजी मार्केट व शॉपिंग सेंटर बांधकाम करण्यासाठी २८ सप्टेंबर २०१२ ला ठराव पारित केला. हा प्रस्ताव प्रथम जिल्हाधिकाऱ्यांकडे व नंतर ८ फेब्रुवारी २०१३ ला नगरविकास विभागाकडे सादर झाला. शासनाने २२ आॅगस्ट २०१४ ला प्रस्ताव अमान्य केला. शासनाची मान्यता मिळाल्यानंतरच अशा विकास कामांचे कार्यादेश देण्यात यावेत, असे निर्देश आहेत; मात्र पालिकेने यश बांधकाम कंपनी यांची निविदा मंजूर करून २२ एप्रिल २०१३ ला कामाचे कार्यादेश दिले. तत्कालीन नगराध्यक्ष म्हणून कासम गवळी यांनी सदर कार्यादेश देणे ही नियमांची उल्लंघन करणारी बाब असल्याचा ठपका ठेवत, जिल्हाधिकारी बुलडाणा यांनी कासम गवळी यांना पदावरून दूर करण्याची शासनाकडे शिफारस केली होती. त्यानुसार राज्यमंत्री, नगरविकास विभाग यांच्यासमोर ३ मे २०१७ ला सुनावणी आयोजित करण्यात आली होती. दोन्ही बाजंूचे म्हणणे ऐकून नगरविकास राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील यांनी मेहकरचे तत्कालीन व विद्यमान नगराध्यक्ष कासम गवळी यांना महाराष्ट्र न.प., नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ५५ अ व ब मधील तरतुदीनुसार अपात्र ठरविण्याचा आदेश गुरुवारी मुंबई येथे दिला. तसेच सहा वर्षांच्या कालावधीसाठी न.प.सदस्य म्हणून निवडणूक लढविण्यासही निरर्ह ठरविण्यात येत असल्याचा आदेश दिला. या आदेशामुळे शहरात खळबळ उडाली असून, शिवसेनेने न.पा. व चौकाचौकांत फटाके फोडून या निर्णयाचे स्वागत केले. न.पा. निवडणुकीतील विजयानंतर पदभार समारंभ कार्यक्रमात शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांनी मेहकरवासीयांना तीन महिन्यात नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीला सामोरे जावे लागेल, असे सूचक विधान केले होते. त्याचीच आज शहरात चर्चा होती.