कुटुंब नियोजनाची पुरुषांना भीती ; गतवर्षी केवळ एकानेच केली शस्त्रक्रिया
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:36 AM2021-02-11T04:36:22+5:302021-02-11T04:36:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क बुलडाणा : नसबंदी फक्त स्त्रियांनीच करावी, असा अलिखित नियम झाला आहे. त्यामुळे कुटुंब नियोजनाबाबतीत नेहमीच पुरुषांच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : नसबंदी फक्त स्त्रियांनीच करावी, असा अलिखित नियम झाला आहे. त्यामुळे कुटुंब नियोजनाबाबतीत नेहमीच पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचीच आघाडी दिसून येते. गतवर्षी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात ९०४ स्त्रियांनी नसबंदी केली होती. त्यातुलनेत केवळ एका पुरुषानेच नसबंदी केली होती.
लोकसंख्या वाढीवर नियंत्रणासाठी शासनामार्फत कुटुंब नियोजनाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. कार्यक्रमांतर्गत नसबंदीच्या शस्त्रक्रियेसाठी प्रामुख्याने महिलांवरच भर दिला जात असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे.
अनेक गैरसमज असल्यामुळे पुरुष शस्त्रक्रिया करण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. तसेच पुरुषांच्या शस्त्रक्रियेसाठी नवनवीन शाेध लागले आहेत. आता अत्याधुनिक पद्धतीने बिनटाक्याची शस्त्रक्रिया करण्यात येते. पुरुषांची शस्त्रक्रिया ही स्त्रियांच्या तुलनेत साेपी आणि जटिल नसते. तरीही याविषयी लाेकांमध्ये जनजागृती नसल्याने पुरुष शस्त्रक्रियेकडे वळतच नसल्याचे चित्र आहे. गत काही वर्षांत झालेल्या शस्त्रक्रियांची आकडेवारी पाहता त्यामध्ये स्त्रियांची संख्या जास्त आहे. पुरुषांची संख्या तुलनेने खूपच कमी आहे. त्यामुळे नसबंदी ही फक्ती स्त्रियांनीच करावी, असा अलिखित नियम झाल्याचे दिसून येत आहे. यामध्ये बदल होणे अपेक्षित असून, आरोग्य विभागामार्फत त्यात बदल होणे अपेक्षित आहे. कुटुंब नियाेजन शस्त्रक्रियेविषयी सर्वच स्तरांवरून जनजागृती करण्याची गरज आहे. तसेच समाजाची मानसिकता बदलण्याची गरज असल्याचे आराेग्य विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ष्ट हाेते.
काय आहेत गैरसमज?
पुरुषप्रधान संस्कृती असल्याने कुटुंब नियोजनाची शस्त्रक्रिया ही महिलांनीच करावी, असा गैरसमज पुरुषांमध्ये आहे. ही स्थिती आजची नाही, तर अनेक वर्षांपासून सुरू आहे. यासोबतच पुरुषांमध्ये शस्त्रक्रियेविषयी भीतीदेखील असते. त्यामुळेच महिलांच्या तुलनेत पुरुषांच्या शस्त्रक्रिया कमी असल्याचे चित्र दिसून येते.
कुटुंब नियोजन हे महिलांसोबतच पुरुषांचीही जबाबदारी आहे. त्यामुळे केवळ महिलांनीच कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करावी, हे चुकीचे आहे. स्त्रियांच्या तुलनेत पुरुषांची शस्त्रक्रिया ही साेपी आणि सुलभ असते. तसेच आता आराेग्य क्षेत्रात अत्याधुनिक साधनांचा वापर हाेत आहे. पुुरुषांची बिनटाक्याची शस्त्रक्रिया हाेत आहे. ही शस्त्रक्रिया केल्याने कुठलेही लैंगिक कमजाेरी येत नाही. याविषयी सर्वच स्तरावर जनजागृतीची गरज आहे.
- डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्य चिकित्सक, बुलडाणा