१९६ व्यवस्थापनाच्या रिक्त जागांसाठी उमेदवारांची गुणवत्ता यादी जाहीर
By संदीप वानखेडे | Published: July 16, 2023 05:33 PM2023-07-16T17:33:26+5:302023-07-16T17:35:14+5:30
सन २०१७ मध्ये शासनाने घेतलेल्या शिक्षक अभियाेग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू आहे.
बुलढाणा : पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून सन २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या अभियाेग्यता परीक्षेतील गुणांच्या आधारे १९६ व्यवस्थापनाच्या मुलाखतीसह जागांसाठी १५ जुलै राेजी रात्री उशिरा गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली आहे़ एका जागेसाठी दहा उमेदवारांची शिफारस पाेर्टलच्या माध्यमातून करण्यात आहे़ या दहा उमेदवारांमधून मुलाखत आणि अध्यापन काैशल्याच्या आधारावर एका उमेदवाराची निवड करण्यात येणार आहे़.
सन २०१७ मध्ये शासनाने घेतलेल्या शिक्षक अभियाेग्यता आणि बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील गुणांच्या आधारे पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिक्षक भरती सुरू आहे. पाच वर्षांचा कालावधी लाेटल्यानंतरही विविध कारणांमुळे ही भरती अजूनही पूर्ण झालेली नाही़ १९६ व्यवस्थापनाच्या मुलाखतीसह पर्याय निवडलेल्या उमदेवारांचे प्राधान्यक्रम नुकतेच घेण्यात आले हाेते़ त्यानंतर १५ जुलै राेजी रात्री पवित्र पाेर्टलवर एका जागेसाठी दहा उमेदवारांची शिफारस गुणाक्रमानुसार करण्यात आली आहे़ येत्या १८ जुलै ते ११ ऑगस्टपर्यंत व्यवस्थापनांना मुलाखत प्रक्रिया पूर्ण करून उमेदवारांची निवड करावी लागणार आहे.
पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून मुलाखतीसह आणि मुलाखतीविना अशा दाेन पद्धतीने शिक्षकांची नियुक्ती करण्यात येत आहे़ त्यातच आतापर्यंत मुलाखतीसह निवडलेल्या ५६१ व्यवस्थांनाच्या दाेन हजार ६१ जागांची भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे़ तसेच १९६ व्यवस्थापनाच्या एसईबीसी प्रवर्गासाठी जागा याेग्य प्रवर्गामध्ये घेऊन पात्र उमेदवारांकडून नव्याने प्राधान्यक्रम घेण्यात आलेल्या आहेत़ या १९६ व्यवस्थापनाच्या मुलाखतीसह पदभरतीसाठी मुलाखत व अध्यापन काैशल्यासाठी उमेदवारांची पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून शिफारस करण्यात आली आहे़
व्यवस्थापनांना उमेदवार निवडीचे अधिकार
पवित्र पाेर्टलच्या माध्यमातून १९६ व्यवस्थापनांच्या इयत्ता ६वी ते १२वी गटातील रिक्तपदासाठी एका जागेसाठी दहा उमेदवारांची शिफारस करण्यात आली आहे़ या दहा उमदेवारांमधून मुलाखत व अध्यापन काैशल्याच्या आधारे एका उमेदवाराची निवड करण्याचे अधिकारी व्यवस्थापनांना आहेत़
रिक्त जागांसाठी विशेष राउंड घेणार
सन २०१७ च्या शिक्षक अभियाेग्यता व बुद्धिमत्ता चाचणीतील गुणवत्तेनुसार ९ ऑगस्ट २०१९च्या फेरीमध्ये पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यामुळे रिक्त राहिलेल्या जागांसाठी माजी सैनिक यांची स्वतंत्र विशेष निवड प्रक्रिया राबवण्यात येणार आहे़ यामध्ये माजी सैनिक उपलब्ध न झाल्यास रिक्त राहिलेल्या जागांपैकी १० टक्के जागा रिक्त ठेवून उर्वरित जागांसाठी त्या त्या प्रवर्गाच्या सर्वसाधारणमध्ये रूपांतरीत करून या जागांसह अपात्र, गैरहजर यांच्या रिक्त जागांसाठी एक राउंड घेण्यात येणार आहे़