बाप्पांना निरोप
By admin | Published: September 9, 2014 01:11 AM2014-09-09T01:11:51+5:302014-09-09T19:17:58+5:30
मिरवणूक हर्षाेल्हासात : मिरवणुकीत मुलींचाही सहभाग
बुलडाणा : दहा दिवसांपासून सुरू असलेल्या गणेशोत्सवाचा उत्साह आज विसर्जन मिरवणुकीत जिल्हाभर दिसून येत होता. टाळ-मृदंगाच्या गजराला ढोल ताशांची जोड, डी.जे., लेझीम पथक, मल्लखांबाच्या कसरती, तलवारबाजीपासून तर चित्तथरारक मैदानी खेळांचे प्रदर्शन अशा उत्साही वातावरणात आज बाप्पाला निरोप देण्यात आला. बाप्पा ! पुढच्या वषी लवकर या.. असा आग्रह धरीत आबालवृद्ध आज बाप्पाला निरोप देताना भावविभोर झाले होते. गणेश विसर्जनासाठी जिल्हा पोलिस अधीक्षक शामराव दिघावकर, जिल्हाधिकारी किरण कुरुंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाभर पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला होता. वृत्त लिहेपर्यंत कुठेही अनुचित प्रकार घडला नव्हता. बाप्पांची विसर्जन मिरवणूक शांततेत व उत्साहात सुरू होती. खामगाव येथे सकाळी तर बुलडाणा, मोताळा, मेहकर, लोणार, सिंदखेड राजा, साखरखेर्डा, शेगाव, चिखली, लोणार येथे मिरवणूक उशिरा सुरू झाली, तर मागील दोन दिवसांपासून दमदार पाऊस येत असल्यामुळे बुलडाण्यात मिरवणुकीत संथपणा आला होता. गणेश विसर्जन मिरवणुकीला आज सकाळपासूनच जिल्हाभरात प्रारंभ झाला. सर्वाधिक गणेश मंडळ असलेल्या खामगावात सकाळी १0 वाजता मानाच्या लाकडी गणपतीची पूजा होऊन मिरवणुकला प्रारंभ झाला. बुलडाण्यात दुपारी ३ वाजता मिरवणुकीला प्रारंभ झाला. संध्याकाळी पावसाने उघडीप दिल्याने मिरवणुकीत भाविक-भक्तांनी जल्लोष भरला. त्यामुळे जयस्तंभ चौक, आठवडी बाजार, जनता चौक, कारंजा चौक, स्टेट बँक चौक परिसरातून निघणार्या मिरवणुकीने रस्ता दणाणूक सोडला होता. तर घरघुती गणेशाचे विसर्जन अजिंठा रस्त्यावरील सरकारी तलावात करण्यात आले. चिखलीमध्ये संध्याकाळी तर मेहकरमध्येही दुपारीच मिरवणूक सुरू झाली. लोणार येथील मिरवणुकींमध्ये ढोलताशांसह गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी चित्तथराराक कसरतींचे प्रदर्शन केले. यावर्षी विहिरी व तलावांना भरपूर पाणी असल्यामुळे विसर्जनाचा प्रश्न भक्तांसमोर भेडसावला नाही. घरगुती गणेश मूर्तींचे गावतलाव तसेच विहिरींमध्ये विसर्जन करण्यात आले. विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला होता. पावसाचा रंग पाहता गणेश मंडळांनी मूर्ती ओली होऊ नये म्हणून प्लॉस्टिकचे संरक्षण लावले होते. तर प्रत्येक तलावावर स्थानिक नगरपालिकेने निर्माल्य जमा करण्यासाठी विशेष व्यवस्था केली होती.
** खामगाव : श्री गणेश विसर्जन मिरवणुकीत केवळ युवकच नव्हे, तर शहरातील मुलीही हिरिरीने सहभागी झाल्याचे दिसून आले. मल्लखांब, फुगडी, लेजीम यासारख्या चित्तथरारक प्रात्यक्षिकांसह उत्कृष्ट झांज वाजवून आपण युवकांच्या तुलनेत तसूभरही कमी नसल्याचे दाखवून दिले. शहरातील श्री तानाजी व हनुमान गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुकीत मुलींचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. गेल्या वर्षीपासून विसर्जन मिरवणुकीत मुलीही सहभागी होत आहेत. ही परंपरा यावर्षीही कायम राहिली. विसर्जन मिरवणूक मार्गावरील विविध चौकात या मंडळांच्या मुलींनी झांज व लेजीम पथकाच्या माध्यमातून भाविकांना मंत्रमुग्ध केले. मुलींचे हे लेजीम पथक व झांज पथक विसर्जन मिरवणुकीतील एक आकर्षण ठरले. वाढलेली संख्यासुद्धा लक्षणीय होती.