लग्नपत्रिकेतून दिला जलसंधारणाचा संदेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2019 04:09 PM2019-03-23T16:09:15+5:302019-03-23T16:09:36+5:30
धामणगाव बढे: वॉटरकप स्पर्धेत गेल्या वर्षी राज्यात द्वितीय स्थानी आलेल्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) गावात चक्क लग्न पत्रिकेद्वारे जलसंधारणाचा संदेश देण्यात आला आहे.
- नवीन मोदे
धामणगाव बढे: वॉटरकप स्पर्धेत गेल्या वर्षी राज्यात द्वितीय स्थानी आलेल्या मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) गावात चक्क लग्न पत्रिकेद्वारे जलसंधारणाचा संदेश देण्यात आला आहे. जलसंवर्धनासाठी संपूर्ण गावच आता झपाटल्यागत काम करत असून त्यातंर्गतच आता थेट लग्नपत्रिकेतही जलसंधारणाच्या विषयाला या गावात प्राधान्य दिल्या गेले आहे.
‘लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वत: कोरडे पाषाण या युक्तीवर’ विश्वास न ठेवता आधि केले मग सांगितले याप्रमाणे मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) वासियांनी ग्रामविकासाची लोकचळवळ राबवून जलसंधारणाच्या माध्यमातून गाव पाणीदार बनविले. आता जलसंधारणाच्या प्रसाराचा व प्रचाराचा विडा जणू गावकºयांनी उचलला असून लग्नपत्रिकेसह इतर पत्रिकेच्या माध्यमातून जलसंधारणाचा संदेश राज्यभर पोहचविला जात आहे. मोताळा तालुक्यातील सिंदखेड (प्रजा) हे सुमारे अडीच हजार लोकवस्तीचे गाव कायम दुष्काळी पट्टा, अशी गावाची ओळख. सरपंच विमल कदम यांच्या नेतृत्वात गावकरी एकवटले, निमित्त झाले वॉटर कप स्पर्धेचे. जिद्द, परिश्रम व एकीच्या जोरावर गावकºयांनी वॉटर कप स्पर्धेच्या राज्यस्तरीय व्दितीय पारितोषिका पर्यंत मजल मारली आणि पहिल्याच पावसात गाव पाणीदार बनले.
अशक्यप्राय वाटणारी कामगिरी पार पाडल्यामुळे गावकरी भारावले. आता आपल्या गावातील गावकºयांच्या कर्तृत्वाची व केलेल्या पराक्रमाची इतरांना माहिती व्हावी, जलसंधारणाच्या कामाचा प्रसार व्हावा व ईतरांनी त्यातून प्रेरणा घ्यावी, यासाठी गावकरी स्वयंप्रेरणेने पुढे सरसावले. लग्नपत्रिकेसह ईतर पत्रिकेतून गावातील जलसंधारणाच्या फोटोसह संदेश दिला जात आहे. सिंदखेड गावातील मनोहर गडाख यांचा मुलगा गजानन याचा विवाह २७ मार्च रोजी सिंदखेड येथे पार पडणार आहे. या लग्नाची पत्रिका जलसंधारणाच्या संदेशात व्यापून गेली आहे. त्यामध्ये वॉटर कप स्पर्धेत गावाची राज्यस्तरीय कामगिरी, शेततळे, जलसंधारणाची कामे, वृृक्षारोपन व वृक्षसंगोपन यामुळे हिरवागार झालेला परिसर याची छायाचित्रासह माहिती दिली आहे.
प्रेरणादायी उपक्रम
आपल्या गावाची यशोगाथा मांडण्याच्या व त्यातून इतरांना प्रेरणा देण्याचा गावकºयांचा प्रयत्न आहे. फक्त प्रसिध्दीसाठी इतरांना उपदेशाचे डोस देण्यापेक्षा स्वत: केले मग इतरांना सांगितले. यामुळे सिंदखेड (प्रजा) वासियांच्या प्रयत्नाचे मोल, महत्त्व व वेगळेपण अधोरेखीत होते.
एकी व नेकीच्या जोरावर गावकºयांनी जलक्रांती केली. त्यामधून इतरांना प्रेरणा मिळावी, कारण काहीही अशक्य नाही, हा संदेश महत्त्वाचा आहे.
-प्रविण कदम, सामाजिक कार्यकर्ते
सिंदखेड (प्रजा).