हवामानाचा अंदाज घेऊन सूक्ष्म व्यवस्थापन करावे-मनेश यदुलवार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:41 AM2021-09-17T04:41:20+5:302021-09-17T04:41:20+5:30
बुलडाणा :पावसाचा लहरीपणा आणि कमी कालावधीत जास्त पडलेला पाऊस यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ ...
बुलडाणा :पावसाचा लहरीपणा आणि कमी कालावधीत जास्त पडलेला पाऊस यामुळे पिकांच्या वाढीवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामुळे हवामान अंदाजाविषयी अद्ययावत माहिती प्राप्त करून शेतीचे सूक्ष्म व्यवस्थापन करावे, असे प्रतिपादन कृषी हवामान तज्ज्ञ मनेश यदुलवार यांनी केले
जून महिन्यात मोसमी पावसाला सुरुवात झाल्यानंतर आतापर्यंतचा पावसाचा प्रवास तालुकानिहाय भिन्न असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे कृषी क्षेत्राशी निगडित असलेल्या खरीप हंगामातील पीक उत्पादनात अस्थिरता निर्माण होऊ नये म्हणून ग्रामीण कृषी मौसम सेवा अंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्र , कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणाच्यावतीने १५ सप्टेंबर राेजी पाेखरी येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले़ यावेळी ते बाेलत हाेते़
जिल्हा कृषी हवामान केंद्र, बुलडाणाचे मनेश यदुलवार (कृषी हवामान तज्ज्ञ), अनिल जाधव (कृषी हवामान निरीक्षक) तसेच कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणाच्या कृषी शास्त्रज्ञ डॉ. भारती तिजारे व दिनेश चर्हाटे ( सहायक) उपस्थित होते.
.पीक प्रात्यक्षिकांचे महत्व व त्याचा शेती क्षेत्रावर होणारा सकारात्मक परिणाम याविषयी डॉ. भारती तिजारे, कृषी शास्त्रज्ञ यांनी यावेळी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले. हवामान बदल आणि शेती व्यवस्थापन यांची योग्य सांगड घालताना मेघदूत/दामिनी ॲपचे योगदान किती महत्वपूर्ण आहे यावर अनिल जाधव, कृषी हवामान निरीक्षक यांनी शेतकऱ्यांना सखोल मार्गदर्शन केले.
याप्रसंगी पोखरी येथील प्रशांत औतकार, पंढरीनाथ एकडे, प्रताप गाडेकर, स्वप्निल वाघ, विष्णू तायडे यांच्यासह इतर शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृषी सल्ला पत्रिकेचा लाभ घ्यावा
ग्रामीण कृषी मौसम सेवा अंतर्गत जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, बुलडाणा यांच्याद्वारे दर मंगळवारी आणि शुक्रवारी हवामान अंदाजावर आधारित तालुकानिहाय आणि पीकनिहाय कृषी सल्ला पत्रिका शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविली जाते. या कृषी सल्ल्याचा शेतकऱ्यांना त्यांच्या दैनंदिन शेतीकामाच्या नियोजनात महत्वाचा वाटा आहे़ म्हणून मोठ्या संख्येने शेतकरी वर्गाने या कृषी सल्ला पत्रिकेचा लाभ घ्यावा व शेतीला शाश्वततेकडे न्यावे असे आवाहन यदुलवार यांनी यावेळी केले.