मध्यरात्रीपासून खामगाव अंधारात
By admin | Published: June 2, 2017 12:12 AM2017-06-02T00:12:09+5:302017-06-02T00:12:09+5:30
तब्बल १० तास खंडित होता वीज पुरवठा; नागरिक हैराण
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : शहरातील कॉटन मार्केट फिडर अंतर्गत झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे बुधवारी रात्री २ वाजतापासून निम्म्या शहराचा वीज पुरवठा खंडित झाला. तब्बल १० तासांपर्यंत हा वीज पुरवठा सुरळीत होऊ न शकल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
कॉटन मार्केट फिडर अंतर्गत उच्च दाब विद्युत वाहिनीची अंडरग्राऊंड केबल जळाल्याने या फिडरवरून होणारा वीज पुरवठा खंडित झाला. त्यामुळे बाळापूर फ ैल, सती फ ैल, रेखा प्लॉट, शिवाजी नगर, जुना फैल, मस्तान चौक, बर्डे प्लॉट, दाळ फैल, फाटकपुरा, रायगड कॉलनी यासह निम्म्याहून अधिक शहरात रात्री २ वाजतापासून अंधार पसरला. सकाळपर्यंत वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला नाही. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा त्रास सहन करावा लागल्याने त्यांच्या झोपेचे खोबरे झाले. दरम्यान, सकाळी ओंकारेश्वर व सजनपुरी फिडरवरून तात्पुरता वीज पुरवठा करण्याची व्यवस्था करण्यात आली. १० वाजेपर्यंत जवळपास ८० टक्के भागातील वीज पुरवठा सुरळीत झाला होता, तर दुरुस्तीचे काम दुपारी ४ वाजताच्या सुमारास पूर्ण झाले. याकरिता सहायक अभियंता अजय गावंडे यांच्या मार्गदर्शनात वीज कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.
संतप्त नागरिकांची तोडफोड
रात्री २ वाजता वीज पुरवठा खंडित झाल्यापासून गौतम चौकातील वीज वितरणच्या कार्यालयावर नागरिकांच्या अनेक झुंडी सकाळपर्यंत येत होत्या. यावेळी तक्रार निवारण केंद्राचा दूरध्वनी बंद असल्याची तक्रार अनेक नागरिकांनी केली, तर संतप्त जमावाने कार्यालयाचे लोखंडी व लाकडी गेट कुलपासह तोडले असल्याची माहिती सहायक अभियंता गावंडे यांनी दिली असून, यासंदर्भात शहर पोलीस स्टेशनला तक्रार देणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
रमजानमध्ये मुस्लीम बांधवांना त्रास
कॉटन मार्केट फिडर अंतर्गत मस्तान चौक, जुना फैल, बर्डे प्लॉट, फाटकपुरा आदी मुस्लीमबहुल वस्तीचा समावेश असल्याने रमजानच्या दिवसांत समाजबांधवांना त्रास सहन करावा लागला. त्यामुळे मुस्लीम बांधवांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.
विद्युत पुरवठ्याच्या बाबतीत तांत्रिक बिघाड हे सांगून होत नाहीत. बिघाड झाल्यानंतर तो शक्य तेवढ्या लवकर दुरुस्त करण्याचा प्रयत्न महावितरणकडून करण्यात येतो. कर्मचारी ऊन पावसाचा विचार न करता आपले कर्तव्य पार पाडत असतात. अशावेळी नागरिकांनी संयम ठेवून सहकार्य करणे अपेक्षित आहे.
-अजय गावंडे, सहायक अभियंता.