बुलडाणा जिल्ह्यातील दूध संकलनात झाली घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2021 11:26 AM2021-08-14T11:26:50+5:302021-08-14T11:26:56+5:30
Milk collection in Buldana district declined : केवळ १९ दुग्ध संस्थाच दूध संकलन करीत असल्याने, बुलडाणा जिल्ह्यातील दूध आटले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
- भगवान वानखेडे
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : कृषिप्रधान असलेल्या बुलडाणा जिल्ह्यात दुग्ध व्यवसायाला चांगलीच मरगळ आली आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत तुटपुंजे दूध संकलन सुरू असून, तब्बल ५०८ दुग्ध संस्था अवसायनात निघाल्या आहेत. केवळ १९ दुग्ध संस्थाच दूध संकलन करीत असल्याने, बुलडाणा जिल्ह्यातील दूध आटले असे म्हटल्यास वावगे ठरू नये.
शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते. या व्यवसायाकडे काही प्रमाणात शेतकरी वळतातही. मात्र, मागील काही वर्षांपासून हा व्यवसाय डबघाईस आला असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सद्यस्थितीत दुग्ध संकलन तुटपुंज्या स्थितीत असून, शेतकऱ्यांनी एक प्रकारे याकडे दुर्लक्षच केले असल्याची स्थिती आहे. जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात दर दिवसाला ५० हजार लीटर दूध संकलन अपेक्षित होते. मात्र, आता केवळ १९ संस्थांकडून केवळ ६२४ लीटर एवढेच दूध संकलन होत असल्याची स्थिती आहे.
यामुळे शेतकऱ्यांकडून संकलन केलेले हे तुटपुंजे दूध घेऊन ते शीतकरण केंद्राला देणेही जिल्हा दुग्ध संस्थेला परवडत नसल्याचे सांगण्यात आले आहे. शेतकऱ्यांना प्रति लीटर २५ रुपये दर देऊनही मोठ्या प्रमाणात दूध संकलन होत नसल्याची स्थिती आहे.
मदर डेअरी उपक्रमातंर्गतही बुलडाण्यात दुग्धोतपादनात वाढ करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. पण अपेक्षीत उत्पदनात वाढ झालेली नाही. जिल्ह्यातील ८० टक्के दुग्धोत्पादन संस्था या अवसायनात गेलेल्या आहेत.
यासाबेतच जिल्हयातील तीन शितकरण यंत्रणी बंद पडलेले आहेत. त्यामुळे दुग्धोत्पादनाला जिल्ह्यात चालना देण्याची गरज निर्माण झाली आहे.
१९ संस्थांकडून दूध संकलन
जिल्ह्यातील देऊळगाव राजा तालुक्यातील १९ संस्थाच फक्त दूध संकलन करीत आहेत. यामध्ये तुळजा भवानी महिला संस्था, गोपाल, संत महंत कुंभारी, महात्मा जोतिबा फुले गिरोली बु., तुळजा माता महिला दुग्ध संस्था गिरोली बु., अनुसया माता दुग्ध संस्था गिरोली बु., बालाजी महिला सावखेड भोई, कामधेनू दुग्ध संस्था सावखेड भोई, कै. भास्करराव शिंगणे जांभोरा, महिला दुग्ध संस्था जांभोरा, माउली दुग्ध संस्था चिंचाेली बुरुकूल, विठ्ठल दुग्ध संस्था देऊळगाव राजा, दत्तदिगंबर दुग्ध संस्था सावखेड भोई, स्वामी विवेकानंद जवळखेड, व्यंकटेश दुग्ध संस्था देऊळगाव राजा, खडकपूर्णा दुग्ध संस्था देऊळगाव मही आणि सावता दुग्ध संस्था देऊळगाव राजा. या १९ संस्थामध्ये दिवसाला ४९९ लीटर तर सिंदखेडराजा येथील दोन संस्थांमध्ये ५७ लीटर आणि मेहकरच्या बालाजी दुग्ध संस्थेत १६९ लीटर दूध संकलन केले जात आहे.
सध्या दूध संकलनाचा काळ नसून, दुधाळ जनावरांना लागणारा चारा उपलब्ध नाही. यामुळेच सध्या ६५० लीटरच्या जवळपासच दूध संकलन होत आहे. ऑक्टोबर नोव्हेंबरनंतर दूध संकलनाला गती मिळण्याची शक्यता आहे.
- ए. व्ही. भोयर, सहायक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध) बुलडाणा.