...तर दूध संकलन केंद्रच उद्ध्वस्त करू! - रविकांत तुपकर यांचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2018 06:14 PM2018-08-07T18:14:25+5:302018-08-07T18:15:40+5:30
भाव न देणाºया डेअरी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली असून, प्रसंगी अशा डेअरींचे दूध संकलन केंद्रच उद्ध्वस्त करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
बुलडाणा: स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आक्रमक आंदोलनानंतर गायीच्या दुधाला १७ रुपयांवरून २५ रुपये दरवाढ राज्य शासनाने दिली असली, तरी बुलडाणा जिल्ह्यातील दोन दूध डेअरींनी अद्याप शेतकºयांना हा भाव दिलेला नाही, त्यामुळे अशा भाव न देणाºया डेअरी विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना पुन्हा आक्रमक झाली असून, प्रसंगी अशा डेअरींचे दूध संकलन केंद्रच उद्ध्वस्त करण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.
प्रती लिटर २५ रुपये भाव न देणाºया डेअरीमध्ये बुलडाणा जिल्ह्यातील अमर दूध डेअरी व मदर दूध डेअरीचा समावेश आहे. या दोन्ही दूध डेअरी अनुक्रमे २१ आणि २२ रुपये भाव दूध उत्पादक शेतकºयांना देत आहे, त्यामुळे शेतकºयांमध्येही यामुळे रोष व्यक्त होत आहे. वास्तविक एक आॅगस्टपासून राज्यातील सर्वच दूध संघांनी गायीच्या दुधाला प्रति लिटर २५ रुपये प्रमाणे भाव द्यायला सुरुवात केली आहे; परंतु बुलडाणा जिल्ह्यातील दूध संकलन करणाºया अमर दूध डेअरी व मदर दूध डेअरी दूध उत्पादकांकडून जुन्याच दराने दूध खरेदी करीत आहेत. या प्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी सोमवारी दुग्ध विकास आयुक्त राजेंद्र जाधव यांच्याशी चर्चा केली असून, तसे निवेदनही त्यांना पाठविले.
२५ रुपये भाव देण्यास बाध्य करणार!
राज्याचे दुग्ध विकास आयुक्त राजेंद्र जाधव यांनीही संबंधित दोन्ही डेअरींना दूध उत्पादक शेतकºयांना प्रती लिटरप्रमाणे २५ रुपये दर देण्यास बाध्य करू, असे आश्वासन स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांना दिले असल्याचे संघटनेने स्पष्ट केले आहे. दोन्ही डेअरी मालकांशी या प्रश्नी प्रत्यक्ष बोलून त्यांना कल्पना दिली जाणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत.