जलयुक्त शिवार योजनेत लाखोंचा भ्रष्टाचार
By admin | Published: June 16, 2017 12:01 AM2017-06-16T00:01:42+5:302017-06-16T00:01:42+5:30
सानंदांची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेंतर्गत कृषी खात्याच्या माध्यमातून सिमेंट नाला बंधारे व नाला खोलीकरणाची कामे सुरू आहेत. शासनाच्या ई-टेन्डरिंग प्रणालीनुसार सगळे नियम धाब्यावर बसवून निविदा मॅनेज केल्या जात असून, ही कामे निकृष्ट दर्जाची होत आहेत व त्या माध्यमातून लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माजी आ. दिलीपकुमार सानंदा यांनी केला आहे. खामगाव येथील विश्रामगृह हे निविदा मॅनेज करण्याचा अड्डा बनला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या सर्व प्रकाराची समयबद्ध कालावधीत नि:पक्षपातीपणे सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी सानंदा यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे एका निवेदनाव्दारे केली आहे.
भाजपाचे सरकार सत्तेत येण्यापूर्वी कृषी खात्यात जलयुक्त शिवाराच्या सर्व स्वरूपांच्या कामाच्या निविदा या १५ ते ३० टक्के कमी दराने येत होत्या; मात्र मागील एक वर्षापासून कृषी खात्यामार्फत ज्या ज्या निविदा काढण्यात आल्या, त्या सर्वच्या सर्व निविदा या मॅनेज करून सी.एस.आर. दराने भरल्या जात आहेत. या मागे जलयुक्त शिवार योजनेंतर्गत निविदाधारकांमध्ये स्पर्धा होऊ नये म्हणून काही गुंडांना हाताशी धरून राजकीय दबावाखाली कंत्राटदारांचा धनाकर्ष घेण्यास टाळाटाळ केली जाते. तर ज्यांनी धनाकर्ष अगोदरच जमा केलेला आहे अशांना तो परत घ्यायला भाग पाडल्या जात आहे.
फक्त जवळच्या कंत्राटदारांनाच कामे मिळावीत, यासाठी राजकीय दबावाखाली निविदांचे लिफाफे खूप काळपर्यंत उघडल्या जात नाही व याव्दारे लाखो रुपयांचा भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांनी केला आहे.