तेल्हारा जलाशयातील लाखो लिटर पाणी गेले वाया !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 7, 2017 12:48 AM2017-11-07T00:48:18+5:302017-11-07T00:51:23+5:30
तालुक्यातील तेल्हारा येथील जलाशयाचे नादुरूस्त असलेले गेट दुरूस्त करून पाण्याचा विसर्ग थांबवावा, अशी वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे पिके धोक्यात आली असून, दोषी कर्मचार्यांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकर्यांनी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चिखली : तालुक्यातील तेल्हारा येथील जलाशयाचे नादुरूस्त असलेले गेट दुरूस्त करून पाण्याचा विसर्ग थांबवावा, अशी वारंवार मागणी करूनही त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे लाखो लिटर पाणी वाया गेल्यामुळे शेतकर्यांची पिके धोक्यात आली असून, याची गंभीरतेने दखल घेऊन संबंधित दोषी कर्मचार्यांवर फौजदारी कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या पाण्यावर विसंबून असलेल्या शेतकर्यांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकारी बुलडाणा यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तेल्हारा जलाशयाचे गेट गेल्या अनेक वर्षांपासून नादुरूस्त असल्याने त्यातून या जलाशयातील पाणी वाया जाते. याबाबत संबंधित विभागाच्या अधिकार्यांना वारंवार गेट दुरूस् तीबाबत सांगुनही शेतकर्यांच्या मागणीकडे हेतुपुरस्सर दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप शेतकर्यांनी केला आहे. तसेच ‘पाणी वाया जावू द्यायचे नसेल, तर तुमचे तुम्हीच करून घ्या’, असे उर्मटपणाचे उत्तरही सिंचन विभागाच्या संबंधित कर्मचार्यांकडून दिल्या गेल्याने या जलाशयातून उपसा पद्धतीने पाणी घेणार्या शेतकर्यांनी माती टाकून पाणी अडविले होते; मात्र संबंधित अधिकारी व कर्मचार्यांनी ती माती जेसीबीच्या सहाय्याने बाजूला करण्यासोबत पुन्हा शेतकर्यांनी असे करू नये, यासाठी त्याठिकाणी मोठ्ठा खड्डादेखील करून ठेवला असल्याने दरवर्षी या जलाशयातून पाणी वाया जाते.
तर यावर्षी आधिच पाणीसाठा कमी असून, त्यात पाणी वाया गेल्यामुळे शेतकर्यांची पिके व खरीप हंगाम धोक्यात आला असल्याने शेतकर्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करून त्यांना पाण्या पासून वंचित ठेवण्यासह पाणी वाया घालविणार्या व कर्तव्यात कसूर करणार्या दोषी अधिकारी व कर्मचार्यांवर फौजदारी दाखल करण्यात यावी व या जलाशयाचे गेट तातडीने दुरूस्त करून द्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकर्यांनी दिला आहे. या निवेदनावर विनायक सरनाईक, गजानन ठेंग, o्रावण बडगे, रोहन गिरणारे, गौतम साळवे, तुकाराम साळवे, भाऊराव सरनाईक, टी. आर. ठेंग, डी.बी.ठेंग, गौतम साळवे, पुरूषोत्तम ठेंग, व्ही.बी.ठेंग, सुधाकर पंडागळे आदी शेतकर्यांच्या स्वाक्षर्या आहेत.