अंगणवाडी पोषण आहारात लाखोंचा घोटाळा : आहार वाटप न करता देयक काढले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2018 06:08 PM2018-08-24T18:08:02+5:302018-08-24T18:09:02+5:30
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या मेहकर भाग-१ अंतर्गंत येणाºया अंगणवाड्यामध्ये पोषण आहार वाटप न करताना एका महिन्याचे बिल काढून संबंधित अधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून लाखों रूपयाचा घोटाळा केल्याची माहिती समोर येत आहे.
- हर्षनंदन वाघ
बुलडाणा : जिल्हा परिषदेच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या मेहकर भाग-१ अंतर्गंत येणाºया अंगणवाड्यामध्ये पोषण आहार वाटप न करताना एका महिन्याचे बिल काढून संबंधित अधिकारी व ठेकेदाराने संगनमत करून लाखों रूपयाचा घोटाळा केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणाची गंभीरतेने दखल घेत जिल्हा परिषद प्रशासनाने चौकशी सुरू केली असून जिल्ह्यात अन्यत्रही त्याची व्याप्ती तर नाही ना? या दिशेनेही सध्या यंत्रणा चौकशी करीत आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पातंर्गंत गरोदर व स्तनदा माता, ६ महिने ते ३ वर्षे वयोगटातील सर्वसाधारण बालके, कुपोषित व तिव्र कुपोषित बालकांना अंगणवडीच्या माध्यमातून पोषण आहार देण्यात येतो. यासाठी नियुक्त एजन्सीच्या ठेकेदाराकडून प्रत्येक महिन्यात पोषण आहार पुरविण्याची जबाबदारी असते. एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पाच्या मेहकर भाग-१ अतंर्गंत १२५ अंगणवाड्या तसेच ६ मिनी अंगणवाड्या आहेत. मात्र या अंगणवाड्यांना मार्च २०१७ या महिन्याचा पोषण आहार संबंधित एजन्सी ठेकेदाराकडून वाटप करण्यात आला नाही. याबाबत मेहकर तालक्यातील वरूड सरपंच सविता रमेश पवार यांनी चौकशी केली असताना वरूड येथील कार्यरत दोन्ही अंगणवाड्यामध्ये रजिष्टर तपासणी केली केली. यावेळी मार्च २०१७ या महिन्याचा पोषण आहार वाटप केल्या नसल्याचे दिसून आले. हा प्रकार उघडकीस येवू नये म्हणून प्रभारी बाल विकास प्रकल्प अधिकारी डिगांबर खटावकर व आहार वाहतूक ठेकेदार नुमान सौदागार यांनी संगनमताने प्रकल्प कार्यालयामध्ये २८ जुलै २०१७ रोजी तातडीची सभा घेवून आहार वाटप केलेल्या पावत्यांवर जबरदस्तीने अंगणवाडी सेविकांच्या स्वाक्षºया घेतल्या व आहार वाटप केल्याबाबतची नोंद घेण्यास भाग पाडले. अशा प्रकारे मार्च २०१७ या महिन्याच्या पोषण आहार वाटप न करताना संबंधित अधिकारी व वाहतूक ठेकेदार यांनी लाखों रूपयांचा घोटाळा केल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी वरूड सरंपच सविता पवार यांनी केलेल्या तक्रारीवरून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक तायडे यांनी नियुक्त केलेल्या चौकशी समितीच्यावतीने ३० आॅगस्ट रोजी संबंधितांची चौकशी करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुखराजन एस. यांच्याशी संपर्क साधला असता ते उपलब्ध होवू शकले नाही.
चौकशी समितीत या अधिकाºयांचा समावेश
मेहकर तालुक्यातील वरड सरपंच सविता पवार यांनी अंगणवाडीत पोषह आहार वाटप न करताना केलेल्या घोटाळ्याची चौकशी त्वरित करावी अन्यथा ५ सप्टेंबर २०१८ रोजी जिल्हा परिषदेसमोर आत्मदहनाचा इशारा दिला आहे. त्यामुळे जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशान्वये जि.प. उपमुकाअ अशोक तायडे यांनी ३० आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशनच्या कक्षात चौकशी ठेवली आहे. या चौकशी समितीत बुलडाणा पंचायत समितीचे विस्तार अधिकारी डी.एम.जाधव, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशनचे सहाय्यक प्रशासन अधिकारी एन.सी.मुळे व गौतम सुरेश तेलंग यांचा समावेश आहे.
चौकशीच्या दिवशी अंगणवडी सेविकांना उपस्थित राहण्याचे आदेश
एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या मेहकर भाग-१ अंगतर्गंत झालेल्या पोषण आहार घोटाळ्याची चौकशी ३० आॅगस्ट रोजी होणार असल्यामुळे संबंधित अंगणवाडीच्या सर्व पर्यवेक्षिका, लिपीक, अंगणवाडी केंद्रातील सेविका व मदतनिस यांना अद्यावत अभिलेख्यांसह आपापल्या केंद्रावर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशामुळे जिल्हा परिषद प्रशासनात खळबळ उडाली आहे.