मिनी हायमास्ट निविदा : खामगावच्या नगराध्यक्ष चौकशीच्या फेऱ्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 03:18 PM2020-01-04T15:18:59+5:302020-01-04T15:19:06+5:30
मिनी हायमास्ट प्रकरणी तीन कंत्राटदार आणि नगराध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: नागरी दलितवस्ती योजनेतंर्गत मिनी हायमास्ट लावण्यासाठी एकाच कंत्राटदाराने २० कामांच्या पूरक निविदांसह ६० निविदा भरल्याच्या प्रकरणी खामगाव नगर पालिकेच्या नगराध्यक्षांच्या चौकशीच्या फेºयात अडकल्या आहेत. मिनी हायमास्ट प्रकरणी तीन कंत्राटदार आणि नगराध्यक्षांना नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
नागरी दलित वस्ती योजनेतंर्गत खामगाव शहरातील विविध भागात मिनी हायमास्ट लावण्यासाठी आपल्या निविदेसह दोन पूरक(सर्पोटींग) निविदा पालिकेला सादर केल्या आहेत. शहरातील २० कामांच्या ४० पुरक निविदांसह सर्व ६० निविदा एकाच कंत्राटदाराने भरल्याचे उघडकीस आले आहे. यासंदर्भात स्वीकृत नगरसेवक संदीप वर्मा यांनी २३ आॅगस्ट २०१९ रोजी तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवर कोणतीही कारवाई न झाल्याने वर्मा यांनी पुन्हा २१ नोव्हेंबर रोजी पुन्हा स्मरणपत्र देत तक्रारीस उजाळा दिला आहे. दरम्यान, नगरसेवक वर्मा यांच्या तक्रारीवरून मुख्याधिकारी धनंजय बोरीकर यांनी तातडीने चौकशी समिती नेमली आहे. यासमितीने निविदा दाखल करणाºया पॉवर केअर इन्टरप्राईजेस, सिध्दी इलेक्ट्रीकल्स अॅन्ड सर्व्हीसेस आणि एबी इलेक्ट्रीकल्स अॅन्ड सर्व्हीसेस या कंपनीच्या संचालकांना आणि नगराध्यक्षा अनिता डवरे यांना समितीसमोर आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस बजावली आहे. सोबतच तक्रारदार संदीप वर्मा यांनाही यावेळी आपली बाजू मांडण्यासाठी नोटीस देण्यात आली आहे.
पेच सोडवा; कंत्राटदारांचे साकडे !
मिनी हायमास्ट निविदा प्रकरणी तक्रार दाखल झाल्याने तीन कंत्राटदारांची चांगलीच भंबेरी उडाली आहे. चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने कंत्राटदारांकडून सत्ताधारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे या पेचातून सुटका करण्यासाठी चकरा वाढल्या आहेत.
मिनी हायमास्ट निविदाप्रकरणी चौकशी करण्यासाठी आपणच पुढाकार घेतला आहे. निविदा आॅनलाईन पध्दतीने दाखल करण्यात आल्या आहेत. त्यामुळे आपल्या हस्तक्षेपाचा प्रश्नच उद्भवत नाही. याप्रकरणी आपली बाजू मांडण्यासाठी आपणांस अद्यापपर्यंत कोणतीही नोटीस प्राप्त झालेली नाही. पारदर्शी चौकशीची आपली मागणी आहे.
- अनिता डवरे
नगराध्यक्षा, खामगाव.
निविदा प्रक्रीया ते वर्कआॅर्डर पूर्वीच्या प्रक्रीयेदरम्यान आपण याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. त्यावेळी आपल्या तक्रारीत तथ्य नाही, असा शेरा देत अध्यक्षांनी याप्रकरणी कार्यादेश देण्याचे सुचविले. त्यामुळे कुठेतरी पाणी मुरत आहे. दरम्यान या निविदा मॅनेज करण्यात सत्ताधारी पक्षाच्या एका नगरसेवकाचा महत्वपूर्ण सहभाग राहीला आहे.
- संदीप वर्मा
तक्रारदार तथा स्वीकृत नगरसेवक, खामगाव.