संग्रामपूर तालुक्यातील अल्पभूधारक शेतकर्याच्या मुलीला दहा पदके!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2018 12:27 AM2018-02-07T00:27:22+5:302018-02-07T00:30:40+5:30
वरवट बकाल (बुलडाणा): आदिवासीबहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील तामगाव येथील अल्पभूधारक शेतकर्याच्या इंद्रायणी मुरलीधर गोमासे या मुलीने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत सोहळ्यात सर्वाधिक पाच सुवर्णपदकांसह एकूण दहा पदके मिळवण्याची असामान्य कामगिरी केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वरवट बकाल (बुलडाणा): आदिवासीबहुल असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील तामगाव येथील अल्पभूधारक शेतकर्याच्या इंद्रायणी मुरलीधर गोमासे या मुलीने अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या ३२ व्या दीक्षांत सोहळ्यात सर्वाधिक पाच सुवर्णपदकांसह एकूण दहा पदके मिळवण्याची असामान्य कामगिरी केली.
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची पाच सुवर्णपदके मिळवण्याची असामान्य कामगिरी सदर मुलीने सर्वाधिक पाच सुवर्णपदकांसह एकूण दहा पदके मिळवण्याची असामान्य कामगिरी केली आहे. बीएसस्सी कृषी पदवी परीक्षेत इंद्रायणी मुरलीधर गोमासे या विद्यार्थिनीने ही नेत्रदीपक कामगिरी केली. इंद्रायणीचे नाव घोषित होताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. आदिवासीबहुल तालुका म्हणून संग्रामपूरची ओळख आहे. या तालुक्यातील तामगाव येथील मुरलीधर गोमासे या अल्पभूधारक शेतकर्याच्या मुलीने आई-वडिलांचे नाव समाजात झळकवले आहे.
इंद्रायणी हिने जळगाव जामोद येथील कृषी महाविद्यालयात बीएसस्सी कृषीची पदवी घेतली. ही पदवी पूर्ण करताना डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या विदर्भातील सर्व महाविद्यालयांमधून या पदवी परीक्षेत सर्वाधिक गुणांक प्राप्त केले. तसेच कीटकशास्त्र, वनस्पती रोगशास्त्र, कृषीविद्या या विषयात सर्वाधिक गुण मिळाले.
अन् आई-वडिलांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या!
मुरलीधर गोमासे यांना तीन मुली व एक मुलगा आहे. इंद्रायणी ही सर्वात मोठी असून, तिने कृषी शिक्षणात नेत्रदीपक कामगिरी केली. तिच्या या गौरव सोहळ्याला, दीक्षांत समारंभाला सोमवारी ५ फेब्रुवारी रोजी तिचे आई-वडील उपस्थित होते. यावेळी कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर, पद्मभूषण तथा नालंदा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय भटकर, उमेशचंद्र सारंगी, डॉ. व्ही. एम. भाले यांच्या हस्ते इंद्रायणीचा गौरव होत असताना तिच्या शेतकरी आई-वडिलांच्या डोळ्यांच्या कडा आनंदाश्रूने पाणावल्या होत्या. संपूर्ण सभागृहाने टाळ्यांचा कडकडाट करून तिच्या या यशाला सलाम केला. सोहळ्यानंतरही विविध मान्यवरांनी इंद्रायणीची भेट घेऊन कौतुक केले.
मुरलीधर गोमासे यांची धडपड प्रेरणादायी
मुरलीधर गोमासे यांच्याकडे तीन एकर शेती असून, पूर्वी बागायती असलेली ही शेती आता पाण्याअभावी कोरडवाहू झाली. अशाही परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत त्यांनी तीन मुली व मुलाचे शिक्षण सुरू ठेवले आहे. एक मुलगी कृषी पदवीधर, दुसरी इंजिनिअर तर मुलगाही इंजिनिअर होत आहे, हे विशेष!