प्राणघातक हल्ला प्रकरणात आरोपींची नावे चुकल्याने पोलीस चक्रावले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 11:09 AM2021-04-01T11:09:16+5:302021-04-01T11:09:37+5:30
Khamgaon Crime News : चार आरोपींच्या नाव साधर्म्यामुळे बुधवारी पोलीस चांगले चक्रावले.
- अनिल गवई
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : स्थानिक आठवडी बाजारातील इंगळे प्राणघातक हल्ला प्रकरणात चार आरोपींच्या नावावरून पोलिसांसह संबंधितांची चांगलीच तारांबळ उडाली. एकाच गुन्ह्यातील चार आरोपींच्या नाव साधर्म्यामुळे बुधवारी पोलीस चांगले चक्रावले.
आठवडी बाजारातील भंगार व्यावसायिक राजेंद्र, गुलाब, निलेश आणि अभय इंगळे यांच्यावरील प्राण घातक हल्ला प्रकरणी नगर पालिका कर्मचारी आणि गुन्ह्यातील आरोपी मोहन अहीरसह सर्वच आरोपींचा पोलीस कसून शोध घेत आहेत. दरम्यान, सतीफैलातील मोहन अहीर आणि त्यांच्या कुटुंबियांचा शिवाजी वेस भागातील मोहन देवीनारायण अहीर यांनी बुधवारी सकाळी पोलीस ठाण्यात हजेरी लावली. ‘ते आम्ही नव्हेच!’ असे म्हणत आमचा गुन्हा काय? आमच्या बदनामीला जबाबदार कोण? अशा प्रश्नांचा भडीमार केला. काहीवेळ रोष व्यक्त केला. मोहन देवीनारायण अहीर यांच्यासोबतच मोहन अहीर यांच्यासह रतन अहीर, आशीष अहीर आणि मनोज अहीर असे नामसाधर्म्य असलेले चौघे पोलीस स्टेशनमध्ये धडकले. नामसाधर्म्यामुळे खामगाव शहर पोलीसांची चांगलीच तारांबळ उडाली. प्रकरण वरिष्ठांपर्यंत पोहोचले. वरिष्ठांकडूनही याप्रकरणी विचारणा होऊ लागल्याने शहर पोलिसांना बुधवारी चांगलेच चक्रावल्याचे दिसून आले.
अहीर कुटुंबातील चौघांना मनस्ताप!
हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपी असलेल्या अहीर कुटुंबातील आणि शिवाजी वेस भागातील अहीर कुटुंबातील चौघांच्या नावामध्ये नामसाधर्म्य आहे. त्यामुळे शिवाजी नगर भागातील मोहन देवीनारायण अहीर, रतन देवीनारायण अहीर या बंधूसह मनोज अहीर आणि आशीष जगदीश अहीर या चौघांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
आरोपी असलेले अहीर कुटुंबिय फरार!
आठवडी बाजारातील इंगळे कुटुंबियांवर हल्ला प्रकरणात प्रमुख आरोपी असलेले मोहन अहीर आणि त्यांचे कुटुंबिय शहरातील सती फैल भागात राहते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर नगर पालिका कर्मचारी मोहन अहीर यांच्यासह गुन्ह्यातील सर्वच २३ आरोपी फरार झाले आहेत. पोलिसांकडून या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
गुन्ह्याची तक्रार नोंदविताना वडिलांचे नाव चुकल्याने माझ्यासह भावाला आणि नाम साधर्म्यामुळे दोन मुलांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. आम्ही काहीही केलेले नसताना समाजात बदनामी झाली. चुकीची दुरूस्ती करण्याचे आश्वासन पोलीस प्रशासनाने दिलंय.
-मोहन देवीनारायण अहीर
शिवाजी वेस, खामगाव.
फिर्यांदीकडून नावे सांगताना वडीलांचे नाव सांगताना गफलत झाली. याप्रकरणी दुरूस्ती केल्या जात आहे. शिवाजी वेस भागातील अहीर कुटुंबियांना कोणताही त्रास होणार नाही, याची काळजी पोलीस घेत आहेत.
- सुनील अंबुलकर
शहर पोलीस निरिक्षक, खामगाव.