आमदार आकाश फुंडकर यांनी केली गारपिटग्रस्त भागाची पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 05:17 PM2020-03-18T17:17:30+5:302020-03-18T17:18:00+5:30
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे.
खामगाव: अवकाळी पाऊस, गारपिटग्रस्त भागाची खामगाव मतदारसंघाचे आमदार आकाश फुंडकर यांनी पाहणी केली. जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनात नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी त्यांनी केली आहे. खामगांवसह संपुर्ण जिल्हयाभरातील नांदुरा, शेगांव,जळगांव जामोद, मोताळा, मेहकर, चिखली,संग्रामपूर,बुलढाणा, मलकापूर, लोणार, सिंदखेडराजा, देऊळगांव राजा या सर्व तालुक्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे मोठे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली. आज भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी खामगांव तालुक्यातील गारपिट, अवकाळी पाऊस व वादळी वा-यामुळे नुकसान झालेल्या गावांचा दौरा केला.
आज खामगांव तालुक्यातील तांदुळवाडी, निपाणा, उमरा भंडारी, कुंबेफळ, भालेगांव, ढोरपगांव काळेगांव हया गावांच्या नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला हयावेळी दौ-यात उपविभागीय अधिकारी श्री चव्हाण, तहसिलदार रसाळ, गोपाल गव्हाळ, पुंडलीक बोंबटकार, लाला महाले, तालुकाध्यक्ष सुरेश गव्हाळ, युवराज मोरे, शांताराम बोधे, राजेश तेलंग, समाधान मुंडे हे सोबत होते. जिल्हाध्यक्ष ॲड आकाश फुंडकर यांनी मा.जिल्हाधिकारी सुमन चंद्रा यांच्याशी फोनव्दारे चर्चा केली. हयावेळी त्यांनी जिल्हाधिकारी यांना शेतक-यांची व्यथा मांडली, ते म्हणाले की, हयागांवामध्ये आसमानी संकटामुळे गहु,मका,हरबरा,काद्यांच्या,टरबूज,कापूस पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शेतक-यांच्या हाताशी आलेला घास हिरावला गेला आहे. यासोबतच काही तालुक्यामध्ये केळी व इतर फळबागांचे मोठया प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. या महिन्यात सतत तिस-यांदा अवकाळी पावसामुळे व वादळी वा-यामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. सोंगून ठेवलेला हरबरा, गहू मातीत मिळाला आहे. रब्बीचे पिक मातीमोल झाले आहेत. हया सोबतच अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे हया सर्व नुकसानीचे पंचनामे होणे आवश्यक आहे. हयाबाबत आपण तातडीने आदेश द्यावे असे त्यांनी मा. जिल्हयाधिकारी यांना सांगितले. हयावर मा. जिल्हाधिकारी यांनी लगेच पंचनामे करण्याबाबत संबंधीतांना आदेश दिले असल्याचे सांगितले.
जिल्हयातील हया आपदाग्रस्तांना राज्य शासनाने तातडीने दयावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष आमदार आकाश फुंडकर यांनी केली आहे. ज्यांच्या घरांची पडझड झाली आहे. अशांना शासनातर्फे तातडीने मदत देण्यासाठी त्यांचे पंचनामे करुन अहवाल सादर करण्याबाबत संबंधीतांना आदेश द्यावे असे ही ते म्हणाले. तरी सुंपर्ण जिल्हयात झालेल्या अवकाळी पाऊस, वादळ वारा व गारपिटीचे तात्काळ पंचनामे करुन व शेतक-यांना मदत देण्यात यावी अशी मागणी भाजपा जिल्हाध्यक्ष यांनी आज केली.