आमदार आकाश फुंडकरांनी घेतली शंकर महाराजांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 03:29 PM2018-09-12T15:29:50+5:302018-09-12T15:30:15+5:30
खामगाव : जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकर महाराज यांची बुधवारी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अॅड. फुंडकर यांनी भेट घेतली.
खामगाव : जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकर महाराज यांची बुधवारी खामगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार अॅड. फुंडकर यांनी भेट घेतली. यावेळी देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज, इलोरा संस्थानचे तुकाराम महाराज, शेगाव येथील ओंकार महाराज-वेरूळकर यांनीही शंकर महाराजांची आस्थेने विचारपूस केली.
जागृती आश्रमातील काहींचा त्रास असह्य झाल्याने, शंकरजी महाराज रविवारी अचानक तपोवनातून निघून गेले होते. त्यानंतर तब्बल दोन दिवसांनी त्यांचा ओंकारेश्वर येथे शोध लागला होता. मंगळवारी दुपारी शंकर महाराज तपोवनात पोहोचले. तेव्हापासून याठिकाणी पश्चिम विदर्भातील भाविकांची तपोवनात गर्दी होत आहे. बुधवारी पहाटेच देवगड संस्थानचे मठाधिपती भास्करगिरी महाराज तपोवनात पोहोचले. त्यानंतर सखारामपूर-इलोरा येथील तुकाराम महाराज आणि शेगाव येथील आेंकार महाराज वेरूळकर शंकर महाराजांच्या भेटीसाठी आले. त्याचप्रमाणे दुपारी १२:३० वाजता खामगाव मतदार संघाचे आमदार अॅड. आकाश फुंडकर यांनी तपोवनात जाऊन शंकर महाराजांची भेट घेतली. यावेळी जागृती परिवाराचे प्रमोद पाटील, महेंद्र रोहणकार यांच्यासह जागृती परिवारातील सदस्यांसोबतच शेकडो भाविकांची उपस्थिती होती.
महाराजांच्या सोबत असल्याची हजारो भाविकांची ग्वाही!
जागृती आश्रमाचे मठाधिपती प.पू. शंकर महाराज खामगाव नगरीचेच नव्हे तर संपूर्ण आध्यात्मिक क्षेत्राचे वैभव आहेत. त्यांचा समाजसेवेचा वसा अनुकरणीय असून, कोणत्याही दबावाला आणि त्रासाला न जुमानता महाराजांनी आपले सेवाकार्य सुरू ठेवावे, अशी ग्वाही हजारो भाविकांनी ‘तपोवना’त यावेळी दिली. मंगळवारप्रमाणेच बुधवारीही भाविकांचा तपोवनात ओघ दुपारपर्यंत सुरूच होता.
जागृतीच्या माध्यमातून प.पू. शंकर महाराजांनी सेवाकार्य यापुढेही सुरू ठेवावे. आपण स्वत: जागृतीचे एक घटक आहोत. त्यामुळे जागृतीच्या संकटात आपण सोबत होतो. यापुढेही जागृतीला आपले सर्वोतोपरी सहकार्य राहील.
- अॅड. आकाश फुंडकर
आमदार, खामगाव मतदार संघ