आ. गायकवाड यांनीच दिली मारहाणीची कबुली; गुन्हा का दाखल नाही? विरोधक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 05:11 AM2024-03-03T05:11:00+5:302024-03-03T05:11:48+5:30
बुलढाण्यात शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीच्या मिरवणुकीदरम्यान एका युवकास आमदार गायकवाड यांनी पोलिसांच्या काठीने मारहाण केल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लोकप्रतिनिधीनेच कायदा हातात घेतल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला होता.
बुलढाणा : शिवजयंतीच्या मिरवणुकीत एका युवकास मारहाण केल्याची कबुली शिवसेनेच्या शिंदे गटाचे आमदारसंजय गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली. कबुली देऊनही गुन्हा दाखल करण्यामध्ये पाेलिस सुस्त का? आमदारांच्या दादागिरीचा प्रभाव पाेलिसांवरही आहे का ? असा सवाल आता विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.
बुलढाण्यात शिवजयंतीनिमित्त १९ फेब्रुवारीच्या मिरवणुकीदरम्यान एका युवकास आमदार गायकवाड यांनी पोलिसांच्या काठीने मारहाण केल्याचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर लोकप्रतिनिधीनेच कायदा हातात घेतल्याने विरोधकांनी संताप व्यक्त केला होता.
वाघाची शिकार करून त्याचा दात जवळ बाळगल्याप्रकरणी वन
खात्याने गुन्हा नाेंदविल्यानंतर नागपूरमधील महिलेची जमीन हडपल्याप्रकरणीही गायकवाड यांच्यावर गुन्हा नाेंदविला गेला. त्यानंतर युवकास केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ समोर आल्यानंतर संताप व्यक्त होत आहे.
पश्चात्ताप नाही
युवकास मारहाण केल्याबाबत आपल्याला पश्चात्ताप होत नसल्याचेही आ. गायकवाड पत्रकार परिषदेत म्हणाले. दरम्यान, नशा करून व शस्त्र सोबत असलेले युवक शोभायात्रेत होते.
एका मुलीच्या तक्रारीनंतर आपण त्यांना मारहाण केली, असे आ. गायकवाड यांचे म्हणणे असले तरी युवकाला पाेलिसांनी ताब्यात घेतले असताना लाेकप्रतिनिधीने पाेलिसाच्या काठीने युवकास झाेडपून काढणे कितपत याेग्य? असा प्रश्न विरोधक उपस्थित करीत आहेत.
अहवाल सादर करू
मारहाण प्रकरणात चौकशी करून अहवाल वरिष्ठांना सादर केला जाईल. सुमोटो तक्रार दाखल करून पोलिसांनीच तपास करणे हे कायद्याला तथा नैसर्गिक न्याय तत्त्वाला धरून नाही, असे जिल्हा पोलिस अधीक्षक सुनील कडासने म्हणाले.
सध्या सातत्याने दहशतीचे राजकारण केले जाते आहे. वरपासून खालपर्यंत राजकारणाची तत्त्वे, विचार यांना तिलांजली दिली गेली आहे. मातृतीर्थ जिल्ह्याचे सुसंस्कृत राजकारण आता कलुषित होत आहे.
- राहुल बोंद्रे, माजी आमदार तथा काँग्रेस जिल्हाध्यक्ष, बुलढाणा
गायकवाड हे आमदार आहेत. कायद्यांचे पालन हे त्यांचे कर्तव्य आहे. एखादा चुकीचा वागत असला तर त्याला पोलिसांकडे द्यावे; पण येथे पोलिसाचीच काठी घेऊन त्यांनी मारहाण केली. पीडिताने बयाण द्यावे. आम्ही पाठीशी उभे राहू.
- प्रा. नरेंद्र खेडेकर, जिल्हा संपर्कप्रमुख, शिवसेना ठाकरे गट