आमदारांनी पेनटाकळी सुप्रमा मान्यतेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये : शंतनू बोंद्रे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2021 04:41 AM2021-02-17T04:41:06+5:302021-02-17T04:41:06+5:30
शंतनु बोंद्रे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गत अनेक दिवसांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. शिंगणे, माजी मंत्री भारत ...
शंतनु बोंद्रे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, गत अनेक दिवसांपासून जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. शिंगणे, माजी मंत्री भारत बोंद्रे व मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय रायमुलकर यांच्या माध्यमातून आपण पेनटाकळी प्रकल्पाच्या ४१६ कोटी रुपयांच्या सुप्रमा मान्यतेच्या प्रश्नाचा पाठपुरवठा करीत होतो व त्याला यश प्राप्त झाले; मात्र चिखलीच्या आमदारांनी या प्रश्नी आपल्या पाठपुराव्याला यश आल्याचे प्रसिद्धीपत्रक काढल्याने पेनटाकळी प्रकल्पाच्या ४१६ कोटी रुपयांच्या सुप्रमा मान्यतेचे श्रेय घेण्याचा प्रयत्न आमदारांनी करू नये असा सल्ला दिला आहे. तसेच जिल्ह्यामध्ये खडकपूर्णा, जिगाव, पेनटाकळी, ब्राह्मणवाडा, करडी, मासरूळ, शिवनी आरमाळ यासारखे असंख्य प्रकल्प भारतभाऊंनी त्या काळामध्ये मंजूर करून घेतले व त्यांच्या कामाचा पाठपुरवठा करून बहुतांशी कामे पूर्णत्वास नेली, तसेच बुलडाणा जिल्ह्याच्या पिण्याच्या पाण्याचा व शेतीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. पेनटाकळी प्रकल्पातील नायगाव खुर्द, नायगाव बु.,पेनसावंगी, कासारखेड, पिंपळगाव उंडा यासारख्या अनेक गावांचे पुनर्वसन शेतकरी व नागरिकांना कुठलीही अडचण येऊ न देता मार्गी लावले. आता राहिला प्रश्न पांढरदेव, घानमोड-मानमोड, देवदरी या गावांच्या पुनर्वसनाचा, या कामासाठी चिखली मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी मागील वर्षी विधानसभेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित करून याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला, ही बाब अभिनंदनीय असल्याचेही स्पष्ट केले आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या परिसंवाद यात्रेदरम्यान या पुनर्वसित गावातील शेतकऱ्यांसमवेत जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील यांची भेट घेऊन सर्व परिस्थिती लक्षात आणून दिली तेव्हा त्यांना परिस्थितीचे गांभीर्य लक्षात आले व त्यांनी या प्रश्नावर तातडीने आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुषंगाने त्यांनी सूचना दिल्या. दरम्यान, मुंबई येथे सचिवांची त्रिस्तरीय बैठक सुरू होण्याअगोदर ना.डॉ. राजेंद्र शिंगणे यांनीदेखील दूरध्वनीद्वारे सचिवांशी चर्चा केली होती. दरम्यान, बैठकीनंतर पेनटाकळी प्रकल्पाच्या सुप्रमास मंजुरी मिळाली, असेही शेवटी शंतनू बोंद्रे यांनी स्पष्ट केले आहे.