बुलडाणा : रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनसेचे जि. प. समोर अर्धनग्न आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2021 11:01 AM2021-08-11T11:01:26+5:302021-08-11T11:01:32+5:30

Buldhana News : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर १० ऑगस्ट रोजी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.

MNS Half-naked movement in front of Buldhana Jilha Parishad | बुलडाणा : रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनसेचे जि. प. समोर अर्धनग्न आंदोलन

बुलडाणा : रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मनसेचे जि. प. समोर अर्धनग्न आंदोलन

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पावसामुळे बुलडाणा जिल्ह्यातील ग्रामीण रस्त्यांची चाळण झाली आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून जीवित हानीही होत आहे. अनेकांना रस्ते अपघातामुळे अपंगत्व आले आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील रस्त्यांची त्वरित दुरुस्ती ककरण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर १० ऑगस्ट रोजी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
ग्रामीण रस्त्यांच्या दुरवस्थेसाठी जिल्हा परिषद प्रशासन जबाबदार असल्याचा ठपकाही मनसेच्या आंदोलकांनी ठेवला आहे. या प्रश्नी वारंवार निवेदने देऊनही जिल्हा परिषद प्रशासनाकडून कुठलीच कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे मनसेने हे आंदोलनात्मक पाऊल उचलले आहे. बुलडाणा जिल्ह्यात जवळपास दोन हजार किमी लांबीचे ग्रामीण रस्ते आहेत. त्यापैकी जवळपास निम्मे रस्ते खराब झालेले आहेत. त्यांची त्वरेने दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या प्रशासनाकडे यावेळी करण्यात आली. 
जि. प. च्या मुख्य प्रवेशद्वारासमोरच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने हे आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र नव निर्माण सेनेचे जिल्हा प्रमुख मदन राजे गायकवाड यांच्या नेतृत्वात जिल्ह्यातील मनसेचे तालुकाध्यक्ष गजानन टेकाळे, शहराध्यक्ष मनोज पवार, शहर उपाध्यक्ष अनिल माेरे, योगेश विसपुते, अंकित मिसाळ, विजय पडोळ, राहूल चौधरी, उमेश नाटेकर, प्रेम सोनोने, बाळराजे देशमुख, राजु मान्टे, गजानन टेकाळे, शिवचरण खोंड, अनिल वाघमारे यांच्यासह अन्य सहभागी झाले होते. यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी घोषणा बाजीही केली. जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश लोखंडे यांना निवेदन देऊन या प्रश्नी चर्चाही करण्यात आली.

Web Title: MNS Half-naked movement in front of Buldhana Jilha Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.