मतदान कक्षात मोबाईल बंदी; सेल्फी बहाद्दरांवर होणार कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 04:09 PM2019-10-20T16:09:45+5:302019-10-20T16:09:51+5:30
आपले मतदान हे गुप्त मतदान असल्याने त्याचा भंग होऊ नये असा नियम आहे.
डोणगाव : मतदान कक्षात सेल्फी काढणाऱ्या सेल्फी बहाद्दरांवर आता निवडणूक विभागाकडून कार्यवाही होऊ शकते. मतदान कक्षात मोबाईल नेण्यास बंदी आहे. त्यामुळे सेल्फी बहाद्दरांनी काळजी घेण्याची गरज आहे.
मतदान प्रक्रियेमध्ये प्रत्येक मतदाराला निर्भयपणे मतदान करता यावे याकरिता निवडणूक विभागाने तयारी केली आहे. आपले मतदान हे गुप्त मतदान असल्याने त्याचा भंग होऊ नये असा नियम आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणूकीत काही हौशी कार्यकर्त्यांनी आपले मतदान कुणाला हे दाखवण्यासाठी थेट मतदान कक्षात मतदान करतांना फोटो, सेल्फी व व्हिडिओ काढले होते. निवडणूक आयोगाने कठोर पावले उचलत मतदान कक्षात मोबाईल व कॅमेरा या सारखे साधने वापरण्यास सक्त मनाई केली आहे. त्यामुळे मतदान कक्षात फोटो किंवा व्हिडिओ काढल्यास कार्यवाही होणार आहे.
निवडणूक विभागाने मतदारांची गुप्तता भंग होणार नाही याची पूर्णपणे काळजी घेतली. मतदान यंत्रावर मतदान करते वेळी मतदार काय करीत आहे हे दिसायला नको म्हणून आडोसा लावलेला असतो. मात्र नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेऊन काही हौशी विविध फंडे वापरतात. आपल्या उमेदवाराशी एकनिष्ठता दाखवण्यासाठी मागच्या लोकसभा निवडणुकीत बटन दाबतांना सेल्फी, व्हिडिओ, फोटो सोशल मीडिया टाकल्या गेले. त्यामुळे गुप्तता भंग झाली. यावर निवडणूक विभागाने विधानसभा निवडणूकीमध्ये मतदाराला वोटर स्लिप पाठविली. त्यात स्पष्टपणे लिहिलेले आहे की, मतदान कक्षात मोबाईल किंवा कॅमेरा असलेले उपकरण वापरता येणार नाहीत. मतदान कक्षात मतदान करतांना उमेदवार, नेते, व्हीआयपी हे आपले फोटो काढून सोशल मीडियावर टाकतात. आता त्यांना सुद्धा मतदान कक्षात फोटो काढायला जमणार नाहीत. मतदारांनी मतदान कक्षात जातांना निवडणूक आयोगाच्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे. आपल्याकडून नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. निवडणूक आयोगाकडून वेळोेवेळी सूचना देण्यात येतात. त्याकडे गांभिर्याने लक्ष देऊन सूचनांचे तंतोतंत पालन करण्याची गरज आहे. विधानसभा निवडणूकीसाठी २१ आॅक्टोंबर रोजी मतदान होत आहे. तर २४ आॅक्टोंबरला मतमोजणी होणार आहे.
मतदान कक्षात कॅमेरा, मोबाईल, चित्रिकरण करणारे उपकरण वापरू नये. असे करतांना आढळल्यास मोबाईल किंवा उपकरण जप्त करण्यात येईल. संबंधितांवर गुन्हा सुध्दा दाखल करण्यात येऊ शकतो.
- गणेश राठोड
निवडणूक निर्णय अधिकारी, मेहकर