संतापजनक, युवतीकडून अल्पवयीन मुलीचा विनयभंग
By सदानंद सिरसाट | Published: June 1, 2024 03:43 PM2024-06-01T15:43:49+5:302024-06-01T15:44:37+5:30
समाजमाध्यमावर पीडितेचे आक्षेपार्ह फोटो व्हायरल
सदानंद सिरसाट, संग्रामपूर (बुलढाणा) : अतिशय संतापजनक आणि माणुसकीला काळिमा फासणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. संग्रामपूर तालुक्यातील एका २४ वर्षीय युवतीने गावातीलच १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना १८ मे ते २८ मे दरम्यान घडली. याप्रकरणी तामगाव पोलिस ठाण्यात ३० मे रोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल झाल्याने एकच खळबळ उडाली.
पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार, अल्पवयीन मुलगी घरात एकटी असताना २४ वर्षीय युवती तिच्या घरात गेली. घराचा दरवाजा बंद करून पीडित मुलीला कपडे काढायला सांगितले. मात्र, अल्पवयीन मुलीने कपडे काढण्यास नकार दिला. त्यावेळी आरोपी युवतीने जिवे मारण्याची धमकी देत पीडितेला अर्धनग्न केले. तसेच भ्रमणध्वनीमध्ये पीडितेचे फोटो काढले. त्यानंतर आरोपी युवतीने अल्पवयीन मुलीसोबत नको ते चाळे करायला सुरुवात केली. पीडितेने आरडाओरड करताच आरोपी युवतीने घरातून पळ काढला. आरोपी युवती इथेच थांबली नाही. तिने इंस्टाग्राम या समाज माध्यमावर बनावट नावाने अकाऊंट तयार करून अल्पवयीन मुलीचे फोटो अपलोड केले.
युवतीने अल्पवयीन मुलीची छेड काढत तिच्याशी पुरुषी लगट करत विनयभंग केल्याची ही पहिलीच घटना संग्रामपूर तालुक्यात उघडकीस आली. दरम्यान, अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून तामगाव पोलिस ठाण्यात आरोपी २४ वर्षीय युवतीवर कलम ४५२, ३५४, ३५४ (अ), ३५४ (ब), ३४२, ५०६, भादंविसह आर डब्ल्यू ८, १२, १४ पोक्सो, आरडब्ल्यू ६७ माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी मलकापूर यांच्या आदेशाने जळगाव जामोदचे पोलिस निरीक्षक आनंद महाजन यांच्याकडे देण्यात आला.