आई मला शाळेत जायचं नाय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 08:37 AM2021-02-05T08:37:30+5:302021-02-05T08:37:30+5:30
कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होत आहेत. याकरिता शिक्षण विभागानेही नियोजन ...
कोरोनाचा आलेख खाली येत असल्याने २७ जानेवारीपासून इयत्ता पाचवी ते आठवीच्या शाळा सुरू होत आहेत. याकरिता शिक्षण विभागानेही
नियोजन केले आहे. शाळा सुरू होत असल्याने काही विद्यार्थी उत्साही दिसून येत असले तरी अनेक दिवसांपासून कोरोना संसर्गामुळे घरीच असलेल्या पाल्यांना शाळेत जावेसे वाटत नसल्याचे पालकांकडून सांगण्यात आले. पालक खबरदारी घेऊन पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी तयार असल्याचे दिसून आले. शाळेत न जाण्यासाठी लहान मुले आई-वडिलांना विविध कारणे सांगून शाळेत न पाठविण्यासाठी विनवणी करीत असल्याचे पालकांनी सांगितले. असे असले तरी मुलांचे भवितव्य पाहता पालक पाल्यांना शाळेत पाठविण्यासाठी तयार असल्याचे दिसून आले.
वर्ग सुरू करण्याची तयारी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळांनी दक्षता घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून देण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होणार नाही, यासाठी सर्व नियमांचे पालन शाळेत करण्यात येईल. सर्व शाळांचे निर्जंतुकीकरण करण्यात आल्याची माहिती प्रभारी शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी दिली.
शाळा कधी सुरू होणार, याचीच वाट पाहत होते. २७ जानेवारीपासून शाळा सुरू होणार असल्याने आनंद वाटत आहे. शाळेसाठी लागणारी सर्व खरेदी पूर्ण झाली आहे.
पायल इंगळे, विद्यार्थिनी
ऑनलाइन शिक्षण कंटाळवाणे झाले होते. शाळेज जाण्याची खूप इच्छा होती; परंतु शाळा सुरू होत नसल्याने मोबाइलवरच दिवसरभर अभ्यास करावा लागत होता. आम्ही शाळेत जाण्याची पूर्ण तयारी केली आहे.
उदय गुळवे, विद्यार्थी
ऑनलाइन शिक्षणच बरे होते. आता शाळा सुरू झाल्याने कोरोनाची भीती वाटते; परंतु आम्ही मास्क वापरून दररोज नियमित शाळेत जाऊ.
जय पवार, विद्यार्थी
शाळा सुरू होणार हे ऐकताच आम्हा सर्व मित्रांना मोठा आनंद झाला आहे. काही मित्रांची खूप दिवसांपासून भेट नव्हती, ते मित्र आता भेटतील. शाळा सुरू होण्याची आम्हाला सर्वांनाच प्रतीक्षा होती.
भूषण देशमुख, विद्यार्थी.