सोने खरेदीचा पाडव्याचा मुहूर्त यंदाही हुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:33 AM2021-04-13T04:33:00+5:302021-04-13T04:33:00+5:30
ऑनलाइन खरेदीला प्रतिसाद नाही, व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा फटका लोणार : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तावर आवर्जून सोने खरेदी केली ...
ऑनलाइन खरेदीला प्रतिसाद नाही, व्यापाऱ्यांना कोट्यवधींचा फटका
लोणार : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तावर आवर्जून सोने खरेदी केली जाते; परंतु कोरोना निर्बंधांमुळे सराफी पेढ्या बंद ठेवाव्या लागणार असल्याने व्यापाऱ्यांनी ऑनलाइन खरेदी, दूरचित्रसंवाद माध्यमातून विक्रीचे पर्याय उपलब्ध केले आहेत; परंतु सोने ऑनलाइन खरेदी करण्याची मानसिकता नसल्याने व्यापाऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.
गेल्या वर्षभरात सण, सोने खरेदीचा मुहूर्त, लग्नसराई अशी सुवर्ण विक्रीची संधी सराफ बाजाराला साधता आली नाही. सोन्याचे दर काही दिवसांपासून कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदीची व्यापाऱ्यांना आशा होती. मात्र, बाजारपेठ बंद असल्याने कोट्यवधी रुपयांचा फटका बसणार असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले. अनेक व्यापारी ऑनलाइन पद्धतीने किंवा दूरचित्र संवाद माध्यमातून ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी प्रयत्नशील आहेत. समाजमाध्यमांवर जाहिराती देऊन ग्राहकांना आकर्षित केले जात आहे. सोन्यासह अन्य मौल्यवान धातूंचे दागिने आणि वस्तू विक्रीतील काही मोठ्या ब्रँडने ऑनलाइन खरेदीचा पर्याय ग्राहकांना दिला आहे.
पाडव्याच्या मुहूर्तावर सराफी पेढ्या उघडणे आवश्यक आहे. पाडव्याला पेढ्या बंद राहिल्या तर एका मुहूर्तावर कोटींहून अधिक रुपयांचे नुकसान होऊ शकते. गेल्या वर्षीही पाडव्याला सराफी पेढ्या बंद होत्या. यंदाही तशीच परिस्थिती आहे. सोने विक्री व्यवसायाची अवस्था बिकट झाली आहे. बाजारात पैसे अडकले आहेत. दागिने बनवून तयार आहेत, पण सगळे व्यवहार ठप्प असल्याचे सांगण्यात येत आहे.
ऑनलाइन खरेदीला अल्प प्रतिसाद
सोने ऑनलाइन खरेदी करण्याची ग्राहकांची मानसिकता नसते. दागिने खरेदीशी अनेकदा भावनिक नाते असते. दागिने हाताळायला अधिक आवडतात. ऑनलाइन खरेदीमध्ये ते शक्य नसल्याने फारसा प्रतिसाद मिळत नाही. काही प्रमाणात दागिने खरेदी ऑनलाइन होते. अनेक सराफांचे पिढ्यान्पिढ्या जोडलेले जुने ग्राहक आहेत. त्यांचाही प्रत्यक्ष खरेदीकडे अधिक कल असतो, असे सराफी पेढ्यांच्या संचालकांनी सांगितले.
पाडव्याला तरी पेढ्या उघडू द्या !
मोठ्या पेढ्यांना ऑनलाइनचा पर्याय असतो; परंतु लहान पेढ्या स्थानिक ग्राहकांवर अवलंबून असतात. लोकांना सहकुटुंब येऊन खरेदी करण्यात रुची असते. म्हणून किमान पाडव्याला तरी सरकारने सोने-चांदीची दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी, अशी छोट्या सराफांची मागणी आहे.