कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिराला मिळाला मुहूर्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:26 AM2021-01-10T04:26:32+5:302021-01-10T04:26:32+5:30
कोरोनामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रम घेण्यात अडचणी येत होत्या. त्यात रक्ताचाही तुटवडा. आरोग्य कर्मचाऱ्यांवर इतर कामांचा ताण, अशा अनेक ...
कोरोनामुळे कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया कार्यक्रम घेण्यात अडचणी येत होत्या. त्यात रक्ताचाही तुटवडा. आरोग्य कर्मचाऱ्यांवर इतर कामांचा ताण, अशा अनेक कारणांमुळे कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर गेल्या नऊ महिन्यात होऊ शकले नाही. दरम्यान, लोकमतमध्ये वृत्त प्रकाशित करून तालुक्यात कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया शिबिर रखडल्याचा मुद्दा समोर आणला होता. या वृत्ताची दखल आरोग्य विभागाने घेऊन शिबिर घेण्याच्या दृष्टीने त्वरित हालचाली सुरू केल्या. आता कोरोना संक्रमण आटोक्यात आल्याने शस्त्रक्रिया शिबिर घेण्यास शासकीय स्तरावर सुरुवात झाली आहे. शनिवारी लोणार ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील पहिले कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले होते. यावेळी ३५ महिलांच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या. मोफत शस्त्रक्रिया शिबिर घेण्याअगोदर प्रत्येक लाभार्थी महिलेची कोरोना चाचण्या डॉ.सोनाली खोडके, पवन चेके, विजय सरकटे यांनी केल्या. ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आल्या. शस्त्रक्रिया शिबिरात खामगाव येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. वानखेडे यांनी सर्जन म्हणून कार्य केले. शिबिर यशस्वीतेसाठी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. किसन राठोड, लोणार ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. फिरोजशाह यांच्या मार्गदर्शनात कोविड केंद्र व्यवस्थापक डॉ. भास्कर मापारी, वैद्यकीय अधिकारी डॉ. कविता मापारी, डॉ. निखिल अग्रवाल, डॉ. शुभम माल, डॉ. स्मृती बोरा, डॉ.पूजा सरकटे यांच्यासह औषध निर्माण अधिकाऱ्यांसह वाहनचालक गजानन देशमुख अधिपरिचारिका मंगला वायाळ, प्रगती मोतेकर, नीलेश वाघ यांनी परिश्रम घेतले.