नालेसफाईस गवसला मुहूर्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:23 AM2021-06-10T04:23:34+5:302021-06-10T04:23:34+5:30
चिखली : गाळ व कचऱ्याने भरलेल्या नाल्यांच्या सफाईला चिखली नगरपालिकेने मंगळवारपासून सुरुवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व्हावी, अशी चिखलीकरांची ...
चिखली : गाळ व कचऱ्याने भरलेल्या नाल्यांच्या सफाईला चिखली नगरपालिकेने मंगळवारपासून सुरुवात केली आहे. पावसाळ्यापूर्वी नालेसफाई व्हावी, अशी चिखलीकरांची ओरड होत होती. मात्र, पालिकेद्वारे शीघ्र कारवाई न झाल्याने ७ जूनला झालेल्या पहिल्याच पावसाने दाणादाण उडाली होती. या पृष्ठभूमीवर ८ जूनपासून पालिकेने नालेसफाईची मोहीम हाती घेतली आहे.
शहरात गत वर्षभरापासून रस्त्यांचे काम सुरू आहे. त्याअंतर्गत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते जिल्हा सहकारी बँकेजवळील रस्त्यापर्यंत नालीचे काम पूर्णत्वास गेले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यावरील नाल्याची सफाईची आवश्यकता नाही. मात्र, अंतर्गत रस्ते, नाले व सर्व्हिस लाइनमधील नालेसफाईची मोठी गरज उपस्थित झाली होती. तथापि, पावसास सुरुवात होण्यापूर्वी नालेसफाई व्हावी, अशी ओरड होत होती. मात्र, लॉकडाऊनमुळे पालिका प्रशासनास यंदा नालेसफाई मोहीम राबविण्यास उशीर झाला. परिणामी, ७ जूनला पडलेल्या पहिल्याच पावसात सखल भागातील अनेक ठिकाणी नाले तुंबले होते. त्यामुळे अनेकांच्या घरात व प्रामुख्याने तळमजल्यावरील गाळ्यात पाणी शिरले होते. नाल्यातील घाण पाणी रस्त्यांवरून वाहत होते. याची दखल घेत नगरपालिका प्रशासनाने नालेसफाईचे नियोजन केले. त्या नियोजनानुसार ८ जूनपासून प्रत्यक्ष मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेसाठी आरोग्य विभागाने सफाई कर्मचाऱ्यांची पथके तयार केली. सोबतच जेसीबी, पालिकेचे ट्रॅक्टर व इतर वाहने दिमतीला असून या पथकाद्वारे नाले, गटाो, चरींची सफाई करण्यात येणार आहे. कालच्या पावसाने तुंबलेल्या नाल्यांमधील कचरा व गाळ प्राधान्याने काढण्यात येत असून टप्प्याटप्प्याने प्रत्येक प्रभागात मोहीम राबवण्यात येणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.
१० लाखांची तरतूद!
शहरातील नालेसफाईच्या मोहिमेसाठी पालिकेने सुमारे १० लाख रुपयांची तरतूद केली आहे. यातून जिथे मशिनरीद्वारे शक्य आहे तेथे मशीनद्वारे तर जिथे मशीनचा वापर शक्य नाही तेथे पालिकेच्या सफाई कामगारांसह कंत्राटी कामगारांद्वारे नालेसफाईची कामे युद्धपातळीवर पूर्णत्वास नेणार आहे, अशी माहिती पालिकेचे मुख्य प्रभारी कार्यालय पर्यवेक्षक अर्जुनराव इंगळे यांनी दिली.
पथकात २० कर्मचाऱ्यांचा समावेश
पालिकेचे आरोग्य निरीक्षक दिलीप इंगळे यांच्या नेतृत्वात नालेसफाईसाठी दोन पथके तयार करण्यात आली असून यामध्ये सुमारे २० सफाई कर्मचाऱ्यांचा समावेश आहे.