जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत बुलडाण्याच्या मोनालीला दोन सुवर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 09:39 AM2019-08-22T09:39:29+5:302019-08-22T09:40:03+5:30
टार्गेट आर्चरी आणि फिल्ड आर्चरी प्रकारात दोन सुवर्ण आणि थ्रीडी आर्चरीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे.
बुलडाणा: चीन मधील चेंगडू शहरात आठ ते १८ आॅगस्ट दरम्यान झालेल्या जागतिक पोलिस क्रीडा स्पर्धेत बुलडाण्याच्या मोनाली हर्षचंद्र जाधव हीने कमपाऊंड इव्हेंटमध्ये दमदार कामगिरी करत टार्गेट आर्चरी आणि फिल्ड आर्चरी प्रकारात दोन सुवर्ण आणि थ्रीडी आर्चरीमध्ये कांस्यपदकाची कमाई केली आहे. त्यामुळे धनुर्विद्या क्रीडा प्रकारात बुलडाणा जिल्ह्याचे नाव सुवर्णाक्षरांनी नोंदल्या गेले आहे. मुळची बुलडाणा शहरातील आनंदनगरमध्ये राहणारी मोनाली जाधव ही २०१३ मध्ये बुलडाणा पोलिस दलात दाखल झाली होती. सध्या ती जलंब पोलिस ठाण्यात महिला पोलिस शिपाई म्हणून कार्यरत आहे. चीनमधील चेंगडू शहरात भारतीय पोलिस दलाचे प्रतिनिधीत्व करताना तिने ही दोन सुवर्ण व एका कांस्य पदकाची कमाई केली आहे. मे २०१९ मध्ये शांघाय येथे झालेल्या जागतिक स्पर्धेत ती सहभागी झाली होती. त्यावेळी तिला नवव्या स्थानावर समाधान मानावे लागले होते. मात्र या स्पर्धेतीलच अनुभव तिला चेंगडू येथील स्पर्धेत कामी आला आणि त्याच्या बळावर तीने ही सुवर्ण कामगिरी केली आहे. चंद्रकांत इलग व सुरेश शिंदे हे तिचे प्रशिक्षक आहेत. चीनमधील स्पर्धेत तीने दमदार कामगिरी करत ७२० गुणांपैकी ७१६ गुण घेत सुवर्ण वेध घेतला आहे. या स्पर्धेत तिची कामगिरी दमदार झाली असली तरी कामगिरीमधील तिचे सातत्य स्पर्धेत दरम्यान जागतिकस्तरावरील खेळाडूंमध्ये चर्चेचा विषय ठरले. दरम्यान, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ यांनीही तिच्या या यशाबद्दल अभिनंदन केले असून पुढील कामगिरीसाठी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.
चेंगडूत लागली शारीरिक व मानसिक कसोटी
भारतात सध्या पावसाळा आहे. त्यातच बुलडाण्यासारख्या थंड हवेच्या शहरातील वास्तव्य यामुळे चीन मधील चेंगडू येथील वातावरणाशी जुळवून घेताना मोनालीची कसोटी लागली. वर्तमानात आपल्याकडे पावसाळा असल्याने वातावरणात गारवा आहे. मात्र चीन मधील चेंगडू शहरात स्पर्धे दरम्यान नागपुरमधील उन्हाळ््यासारखे वातावरण होते. त्यामुळे त्या वातावरणाशी जुळवून घेताना मोनालीचा शारीरिक व मानसिक कस लागला. वातावरणाशी जुळवून घेतांनाच सुवर्ण वेध घेण्याची तिने केलेली कामगिरी ही त्यादृष्टीने अत्यंत महत्त्वाची म्हणावी लागले.
शनिवारी येणार बुलडाण्यात
चीनमध्ये बुलडाण्याचा डंका वाजविल्यानंतर मोनाली जाधव ही भारतात दाखल झाली आहे. सध्या नागपूरवरून ती मुंबईला डीजी आॅफीसला जात आहे. दरम्यान २४ किंवा २५ आॅगस्ट रोजी ती बुलडाण्यात दाखल होणार आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धेत बुलडाण्याचा लौकिक पोहोचविणाºया मोनालीचे पोलिस दल व बुलडाणेकर आता कसे स्वागत करतात हा उत्सूकतेचा विषय बनला आहे.