मलकापूर तालुक्यातील ‘रोहयो’ कामगारांच्या खात्यातून पैसे गायब!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 7, 2017 11:55 PM2017-12-07T23:55:50+5:302017-12-07T23:58:38+5:30
मलकापूर : विदर्भाच्या प्रवेशद्वारी वसलेल्या मलकापूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेत काम करणार्या अनेक कामगारांच्या भारतीय स्टेट बँकेतील खात्यातून जमा झालेली रक्कम अचानक गायब झाली.
हनुमान जगताप।
लोकमत न्यूज नेटवर्क
मलकापूर : विदर्भाच्या प्रवेशद्वारी वसलेल्या मलकापूर तालुक्यातील रोजगार हमी योजनेत काम करणार्या अनेक कामगारांच्या भारतीय स्टेट बँकेतील खात्यातून जमा झालेली रक्कम अचानक गायब झाली.
दोन आठवड्यातच आधार कार्ड लिंक केल्यावर ती रक्कम शून्य बॅलन्स झाल्याचा धक्कादायक प्रकार येथे उघडकीस आला आहे. या विषयाला दुजोरा देत जिराकाँ सरचिटणीस संतोष रायपुरे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा झाल्याच सांगून चौकशीची मागणी केली आहे.
यासंदर्भात अधिक माहिती अशी, की केंद्र शासनाच्या आवाहनानुसार देशभरातील गोरगरिबांनी जनधन योजनेत राष्ट्रीयीकृत बँकेत आपली खाती उघडली आहेत. शासनाच्या विविध योजनांचा विविध योजनांचा सरळ लाभ व्हावा, हा त्यामागील उद्देश. त्याच मलकापूर तालुक्यात मौजे हरसोडा शिवारात रोजगार हमी योजनेत काम करणार्या असंख्य मजुरांनीही त्यांची खाती राष्ट्रीयीकृत बँकेत उघडली आहेत. विविध लाभांची त्यांनादेखील प्रतीक्षा आहे.
असंख्य खातेदारांपैकी एक असलेले अरुण रामचंद्र झाल्टे यांनीदेखील भारतीय स्टेट बँकेत खाते उघडले. त्यांच्या ३२९१७९९४५६२ या नंबरच्या खात्यात १५ नोव्हेंबर २0१७ रोजी काही पैसे जमा झाले. त्यांनी काही रकमेचा विड्रॉल करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांनी त्यांच्या खात्याशी आधार कार्ड लिंक केले. दोन आठवड्यांनंतर त्यांच्या खात्यातील जमा असलेली ९९ हजार ९९९ रुपयांची रक्कम डिलिट झाल्याच २८ नोव्हेंबर रोजी उघड झाले.
एटीएममध्ये विड्रॉल करण्यासाठी २ डिसेंबर रोजी अरुण झाल्टे गेले असता त्यांच्या खात्यात बॅलन्सच नाही, अशी पावती त्यांना मिळाली. मलकापूर तालुक्यात एक नव्हे असंख्य मजुरांसोबत हा प्रकार घडला.
या माहितीस जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस संतोष रायपुरे यांनी दुजोरा दिला आहे. त्यांनी ६ डिसेंबर रोजी बुलडाण्याचे जिल्हाधिकारी चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याशी या विषयावर चर्चा झाल्याच सांगितले, तर जिल्हाधिकार्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांना चौकशीच्या सूचना देण्याची हमी घेतल्याची माहितीही रायपुरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली आहे.
या विषयावर बँकेशी संवाद साधण्याचा प्रयत्न प्रस्तुत प्रतिनिधीने केला; मात्र तो होऊ शकला नाही. मुद्दा असा की, एखाद्या जनसामान्य मजुराच्या खात्यात पैसा कुठून येतो व कसा येतो आणि आधार कार्ड लिंक केल्यावर गायब होतो.
हा धक्कादायक प्रकार एक नव्हे, अनेकांसोबत घडल्याचे वास्तव मलकापुरात उघडकीस आले असून, तूर्तास खात्यात पैसा येऊन गायब झाल्याने त्या असंख्य मजुरांच्या आनंदावर विरजण पडल्याचे वास्तव आहे.