प्रचारात ‘मनी पॉवर’ भारी ठरते
By admin | Published: October 2, 2014 11:36 PM2014-10-02T23:36:29+5:302014-10-02T23:36:29+5:30
निष्ठावान दुरावले : रोजंदारीच्या कार्यकर्त्यांवरच प्रचाराची मदार.
बुलडाणा : विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी केवळ ११ दिवस उरले आहेत. बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये प्रचाराचे संदर्भही बदलले आहेत. निष्ठावान कार्यकर्ता घरी बसलेला आहे, तर प्रचाराची धुरा भाडोत्री कार्यकर्ते सांभाळत आहेत. बहुतेक मतदारसंघांत उमेदवारांचे नातेवाईक प्रचाराचा भार वाहताना दिसत आहेत. सध्याच्या राजकारणात निष्ठा, विचार आदींची वाट लागली आहे. केवळ मनीपॉवरचा बोलबाला आहे. भाडोत्री कार्यकर्त्यांची चंगळ आहे. दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी होत आहे. रॅली, प्रचारसभांसाठी रोजंदारीने कार्यकर्ते गोळा केले जात आहेत. नवख्या उमेदवारांसाठी हे वातावरण अडचणीचे आहे. सभा व रॅलींमध्ये ह्यपेडवर्कर्सह्ण चा बोलबाला आहे. प्रचारासाठी कमी दिवस उरल्याने कार्यकर्त्यांचा भाव वधारला आहे. प्रचारासाठी फिरल्यानंतर जेवणाची सोयदेखील उमेदवारांना करावी लागत आहे. अनेकांनी साडी-चोळी, कुणी दिवाळीचा किराणा आदींची आमिषे दाखिविली आहेत. प्रचाराच्या नव्या ट्रेंडमध्ये सच्चा कार्यकर्ता दुरावला जात आहे.
कमी दिवसांत अधिकाधिक मतदारांपर्यंत पोहोचण्याचे आव्हान उमेदवारांसमोर असल्याने ग्रामीण भागातून कार्यकर्त्यांंची आयात करण्याचे सत्र सुरू आहे. निवडणुकीच्या कार्यात चहा, नाश्ता, जेवण आणि भरपूर भत्ता, शिवाय मतदारसंघात फिरण्यासाठी वाहनांची सोय असल्याने ग्रामीण भागात शे तीच्या कामांसाठी मजूर मिळेनासे झाले आहेत. युती-आघाडी कायमच राहणार, हे गृहीत धरून ज्या उमेदवारांनी प्रचार साहित्य तयार केले त्यांच्यावर हे साहित्य फेकून देण्याची वेळ आली; पण निवडणूक लढवायची तर पुन्हा प्रचार साहित्य तयार करणे आलेच. त्यामुळे यंदा प्रचार साहित्याची विक्री करणार्या दुकानदारांचा दुप्पट लाभ झाला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला आता खर्या अर्थाने वेग आला आहे. सर्वच प्रमुख पक्षांकडून वरिष्ठ नेत्यांच्या आणि स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांचे आयोजन केले जात आहे. त्यामुळे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. सामान्य जनतेचे या आरोप-प्रत्यारोपांमधून भरपूर मनोरंजन होत आहे, हा भाग वेगळा.