माकड जेरबंद; मोताळावासीयांनी सोडला सुटकेचा नि:श्वास
By admin | Published: September 22, 2016 01:30 AM2016-09-22T01:30:29+5:302016-09-22T01:30:29+5:30
बुधवारी वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून माकाडाला जेरबंद केले.
मोताळा(जि. बुलडाणा), दि. २१- मागील दोन आठवड्यांपासून येथील तहसील कार्यालयासह पंचायत समिती परिसरात धुमाकूळ घालून दहशत पसरविणार्या माकाडाला बुधवारी वनविभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवून बसस्थानक परिसरातून जेरबंद केले. गेल्या काही दिवसांपासून तहसील कार्यालयासह पंचायत समिती परिसरात एका पिसाळलेल्या माकडाच्या र्मकटलीलांनी नागरिकांना जेरीस आणले होते. या माकडाने ११ स प्टेंबर रोजी शुभम ज्ञानदेव वले या विद्यार्थ्याला जखमी केले होते, तर १२ सप्टेंबर रोजी याच माकडाने तहसील कार्यालयात प्रचंड धुमाकूळ घालून सेवानवृत्त शिपाई राजाराम चव्हाण, करवा जाधव, राजू शिंदे, प्रशांत इंगळे यांना चावा घेऊन चांगलीच दहशत पसरवली होती. माकडाच्या हैदोसाने त्रस्त झालेल्या परिसरातील महिलांनी मंगळवारी वन विभागाच्या कार्यालयात धाव घेऊन माकडाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली. दरम्यान, माकडाला पकडण्यासाठी २१ सप्टेंबर रोजी वन विभागाने पहाटे पाच वाजेपासून रेस्क्यू ऑपरेशन राबविले. यासाठी बुलडाणा येथून ट्रॅक्विलायझर गनसह आलेल्या रेस्क्यू टीमने दहशत पसरविणार्या माकडाला पकडण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. ट्रॅक्विलायझर गनद्वारे त्याला चार वेळेस इंजेक्शन मारण्यात आले. तिसर्या व चौथ्या इंजेक्शनच्या प्रभावामुळे सदर माकड बेशुद्ध झाले.