जिल्ह्यात १० जूननंतर मान्सूनचे आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 31, 2021 04:25 AM2021-05-31T04:25:23+5:302021-05-31T04:25:23+5:30
बुलडाणा जिल्ह्यात साधारणत: २३ मे नंतर मान्सूनपूर्व पाऊस पडतो. त्यातच यावर्षी यास वादळाच्या परिणामामुळेही जवळपास आठ तालुक्यांत मान्सूनपूर्व पावसाने ...
बुलडाणा जिल्ह्यात साधारणत: २३ मे नंतर मान्सूनपूर्व पाऊस पडतो. त्यातच यावर्षी यास वादळाच्या परिणामामुळेही जवळपास आठ तालुक्यांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावलेली आहे. त्यामुळे शेतकरीवर्ग शेती मशागतीच्या कामाला वेगाने लागला असून खत, बियाणे खरेदीसाठी लगबग सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा कृषी हवामान केंद्राच्या तज्ज्ञांना विचारणा केली असता बुलडाणा जिल्ह्यात १० ते १५ जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होत असते, असा सर्वसाधारण अनुभव असल्याचे सांगण्यात आले. सध्या पडणारा पाऊस हा मान्सूनपूर्व पाऊस असल्याचेही जिल्हा कृषी हवामान केंद्रातील तज्ज्ञ मनेश येदुलवार यांनी स्पष्ट केले आहे.
यावर्षी मान्सूनचे आगमन वेळेवर होत असल्याचे संकेत आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनुकूल वातावरण असल्यास बुलडाणा जिल्ह्यात १० ते १५ जूनदरम्यान मान्सूनचे आगमन होईल, असे त्यांचे म्हणणे आहे. प्रसंगी तीन दिवस यात मागेपुढे होऊ शकतात, असा अंदाजही त्यांनी व्यक्त केला आहे.
--१८ हजार शेतकऱ्यांना लाभ--
जिल्हा कृषी हवामान केंद्राकडून आठवड्यातून दोनदा कृषीविषयक हवामान अंदाज व्यक्त केला जातो. त्याचा थेट लाभ सध्या १८ हजार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहे. टप्प्याटप्प्याने ही संख्या येत्या काळात वाढविण्यात येणार असल्याचेही सूत्रांचे म्हणणे आहे. हवामान बदलाच्या दृष्टीने बुलडाणा जिल्हा हा संवेदनशील जिल्हा अलीकडील काही काळात बनला आहे. त्या पार्श्वभूमीवर हे जिल्ह्यात कृषी हवामान केंद्र मधल्या काळात सुरू करण्यात आलेले आहे.