वीज चोरी केल्याप्रकरणी मॉन्टे कॉर्लो कंपनीला २१ हजाराचा दंड!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 12:05 PM2021-01-23T12:05:14+5:302021-01-23T12:05:32+5:30
Khamgaon News वीज चोरी केल्याप्रकरणी अहमदाबाद येथील एका कंत्राटदार कंपनीस २१ हजाराचा दंड ठोठावण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: रस्ता विस्तारीकरणादरम्यान पुलाचे बांधकाम करताना वीज चोरी केल्याप्रकरणी अहमदाबाद येथील एका कंत्राटदार कंपनीस २१ हजाराचा दंड ठोठावण्यात आला. याप्रकारामुळे रस्ताकाम करणाºया कंत्राट कंपन्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
नांदुरा रोडवरील पारखेड फाटा ते पहुरजीरा-माक्ता, कोक्ता, जयपूर लांडे, शेलोडी शिवार ते टेंभूर्णा अकोला रोडपर्यंत रस्ता विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. दरम्यान टेंभूर्णा नजीक पुलाच्या बांधकामासाठी वीज चोरी करण्यात येत असल्याचे समजताच महावितरणच्या अधिकाºयांनी १८ जानेवारी रोजी सायंकाळी संबंधित ठिकाणी छापा टाकला होता. यावेळी घटना स्थळावरून लोखंडी सळई कापण्याचे कटर, तीन सॉकेट, लाईट, वायर असे साहित्य जप्त करण्यात आले. दरम्यान, वीज वितरण कंपनीने अहमदाबाद येथील मॉन्टे कॉर्लो कन्स्ट्रक्शन कंपनीस २१ हजाराचा दंड ठोठावण्यात आला.
रस्ता विस्तारीकरणाचे काम घेतलेल्या कंत्राटदार कंपनीकडून सहा ठिकाणी पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे. यापैकी एकाच ठिकाणी विजेची चोरी पकडण्यात आली आहे. उर्वरीत पाचही ठिकाणी कंपनीने वीजेचा अवैध वापर केल्याची चर्चा आहे.