रस्त्यांच्या विकासात जाणार आणखी १२०० वृक्षांचा बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 30, 2019 02:12 PM2019-12-30T14:12:17+5:302019-12-30T14:12:23+5:30
राष्ट्रीय महामार्ग विभागाने सर्वेक्षण केले असून १२०० वृक्षांच्या कत्तलीचा परवाना मिळविण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
- योगेश देऊळकार
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा : राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या वतीने जिल्ह्यात बुलडाणा-खामगाव रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम प्रस्तावित आहे. हे काम जवळपास ४७ किमीचे असून ६० कोटींचा खर्च त्यास अपेक्षित आहे. यासाठी वृक्षतोडीचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. यानुसार रुंदीकरणात अडसर ठरणाऱ्या १२०० वृक्षांची कत्तल करावी लागणार आहे. यामुळे आता पुन्हा रस्त्यांच्या विकासात नव्या-जुन्या १२०० वृक्षांचा बळी जाणार असल्याचे चिंताजनक चित्र आहे.
जिल्ह्यात अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग विभागातर्फे रस्त्यांची कामे करण्यात येत आहेत. यापैकी काही कामे पूर्णत्वास गेली असून काहींची डेडलाईन संपूनही काम अर्धवट आहे. काम पूर्ण झालेल्या रस्त्यांमध्ये चिखली-खामगाव, शेगाव-खामगाव तर अपूर्ण असलेल्यांमध्ये चिखली-टाकरखेड व अजिंठा-बुलडाणा या रस्त्यांचा समावेश आहे. यासाठी आतापर्यंत मोठ्या प्रमाणात झाडे तोडण्यात आली. आता पुन्हा बुलडाणा-खामगाव या रस्त्याचे डांबरीकरण व रुंदीकरणाचे काम प्रस्तावित आहे. सध्या साडेपाच मीटर रुंदीचा असलेला रस्ता आता सात मीटरपर्यंत वाढविण्यात येणार आहे. रूंदीकरणासाठी जंगल क्षेत्रातील रस्ता अपवाद आहे. याव्यतिरिक्त रुंदीकरणात अडसर ठरणारी झाडे तोडणे गरजेचे आहे. यासाठी राष्ट्रीय महामार्ग विभागाने सर्वेक्षण केले असून १२०० वृक्षांच्या कत्तलीचा परवाना मिळविण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. विकासाच्या प्रक्रियेत मजबूत रस्त्यांना महत्त्वाचे स्थान असते. यादृष्टीने जिल्ह्यात सिमेंट रस्त्यांची निर्मिती करण्यात येत आहे. मात्र विकासाच्या या प्रक्रियेत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमीका पार पाडत असलेल्या झाडांचा बळी जात आहे. रस्त्यांचे काम करत असताना अडसर ठरणाºया झाडांची कत्तल करणे साहाजिक आहे. परंतु, या वृक्षांची तोड करण्यापूर्वी नवीन वृक्षांची लागवड करण्याच्या दृष्टीने पाऊले उचलण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग विभागाने रस्त्याच्या कामाला सुरूवात करण्यापूर्वी तसे नियोजन केल्यास ते शक्य होईल. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यावरदेखील नव्याने वृक्ष लागवड करता येऊ शकते. एवढे सर्व करत असताना त्या वृक्षांच्या संगोपणासाठी पुढाकार घेणेही तेवढेच महत्त्वपूर्ण ठरते.
पर्यावरणाचा ढासळतोय समतोल
जिल्ह्यातील जुन्या वृक्षांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. औद्यागिक क्षेत्र अतिशय कमी असल्याने या क्षेत्रातील विकासासाठी झाडे तोडण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. प्रामुख्याने रस्त्यांचे रुंदीकरण किंवा बांधकामात अडसर ठरणारी झाडे तोडण्यात येतात. अलीकडच्या काळात मजबुत रस्ते बनविण्यावर शासनाचा भर आहे. यामुळे हे सर्व करीत असताना वृक्षतोडीमुळे होणाºया नुकसानाकडे कोणाचेही लक्ष नाही. यामुळे हळूहळू पर्यावरणाचा समतोल ढासाळत असून कधी कोरडा तर कधी ओल्या दुष्काळाचा सामना करावा लागत आहे. तापमानातही असमतोल दिसून येतो. उन्हाळ्यातील तापमान वर्षानुवर्षे उच्चांक गाठत असून थंडीच्या दिवसांमध्ये तापमान अतिशय कमी होत असल्याने कडाक्याचा थंडीलाही नागरिकांना सामोरे जावे लागत असल्याचा अनुभव येत आहे.
रस्ते निर्मितीप्रमाणेच वृक्ष लागवडीची प्रक्रिया महत्त्वपूर्ण
रस्ते निर्मितीवर शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपयांचा खर्च करण्यात येतो. हा खर्च फलदायी असून यामुळे विकासाची प्रक्रिया गतीमान होते. हे सर्व चित्र आशादायी असले तरी असेच लक्ष वृक्ष लागवड व संगोपनाकडे केंद्रीत करणे गरजेचे आहे. वृक्ष लागवड व संगोपनासाठी योग्य खर्चाचे नियोजन करून ही प्रक्रिया प्रभावीपणे राबविण्याची जबाबदारी संबंधित विभागावर सोपविल्यास येत्या काही दिवसात नक्कीच सकारात्मक बदल दिसून येतील. मात्र यासाठी गरज आहे ती शासन, प्रशासनाने योग्य दिशेने पाऊले उचलण्याची.
जिल्ह्यातील मुदत संपलेल्या रस्ता कामाच्या मुदतवाढीचा प्रस्ताव वरीष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे. रस्त्यांच्या कामाची मुदत संपली असली तरी काम सुरू आहे. आता नवीन कामासाठी वृक्षतोडीच्या परवान्यासाठी प्रस्ताव तयार केला आहे. रस्त्याचे काम झाल्यानंतर नव्याने वृक्ष लागवड करण्यात येईल.
- के. बी. दंडगव्हाळ, उपअभियंता, राष्ट्रीय महामार्ग खामगाव.