लांजूड लघू प्रकल्पातून २०० पेक्षा जास्त ब्रास गौण खनिजाची चोरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 01:53 PM2019-11-05T13:53:58+5:302019-11-05T13:54:05+5:30
तहसीलदारांनी जान्दू कंन्स्ट्रक्शन कंपनीला २० लक्ष ८० हजाराचा दंड ठोठावला.
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव: खामगाव तालुक्यातील लांजूड येथील लघू प्रकल्पाच्या सांडव्यातील गौण खनिज चोरी प्रकरणी पंचनाम्यास विलंब झाल्याने शासनाचा मोठ्याप्रमाणात महसुल बुडाल्याचे समोर येत आहे. सांडव्यातील अवैध गौण खनिज चोरी प्रकरणी तहसीलदारांनी जान्दू कंन्स्ट्रक्शन कंपनीला २० लक्ष ८० हजाराचा दंड ठोठावला. मात्र, घटनेनंतर वेळीच महसूल प्रशासनाकडून पंचनामा करण्यात आला असता तर दंडाची रक्कम कितीतरी पटीने वाढल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
खामगाव तालुक्यातील लांजूड शिवारातील शेतसर्वे क्रमांक १५४ अ आणि १४८ ला लागून असलेल्या परिसरातून ४ ते ७ जुलै दरम्यान रात्रीच्या अंधारात हजारो गौण खनिजाची चोरी करण्यात आली. यासंदर्भात ५ जुलै रोजी जिल्हाधिकारी बुलडाणा यांच्याकडे तक्रार करण्यात आली. या तक्रारीत गौण खनिज चोरीसाठी ३ पोकलेन आणि १५ टिप्परचा वापर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. तसेच ४ जुलैच्या रात्री १० वाजतापासून ५ जुलैच्या पहाटेपर्यंत मोठ्याप्रमाणात गौणखनिजाची चोरी करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले. त्याचप्रमाणे स्थानिक महसूल प्रशासनालाही याची जाणिव करून देण्यात आली. मात्र, प्रत्यक्षात तलाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांनी पंचनाम्यास विलंब केला. त्यानंतर अपुरा पंचनामा करण्यात आल्याचेही सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण सनानसे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
बोरजवळा गौण खनिज चोरी प्रकरणी तपास थंडबस्त्यात!
खामगाव तालुक्यातील बोरजवळा येथील तलावातून जुलै महिन्यात मोठ्याप्रमाणात गौण खनिजाची चोरी करण्यात आली होती. याप्रकरणी बोरजवळा येथील तलाठी यांनी पंचनामा अहवाल महसूल प्रशासनाकडे सादर केला. त्यानंतर तहसीलदारांनी या तलावातील गौण खनिज चोरीप्रकरणी तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, बोरजवळा येथील गौण खनिज चोरी प्रकरणी अद्यापही तपास थंडबस्त्यात असल्याचे दिसून येते.
लांजूड प्रकल्पातून चोरीसाठी ३ पोकलेन आणि १५ पेक्षा जास्त टिप्परचा वापर करण्यात आला. त्यामुळे पंचनाम्यापेक्षा कितीतरी पटीने या तलावातून गौण खनिजाची चोरी झाली. मात्र, महसूल प्रशासनाने पंचनामा विलंबाने केल्याने कंत्राटदाराचा लाभ असून, शासनाचा महसूल बुडाला. याबाबत जिल्हाधिकाºयांकडे तक्रार केली आहे.
- लक्ष्मण सनानसे
सामाजिक कार्यकर्ता, पारखेड ता. खामगाव.