खामगाव शहरातील ४० पेक्षा अधिक इमारती धोकादायक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2019 12:20 PM2019-08-01T12:20:18+5:302019-08-01T12:22:52+5:30
बुलडाणा जिल्ह्यात अनेक शिकस्त आणि धोकादायक इमारती उभ्या असतानाही काही पालिका प्रशासनाकडून सर्व्हेच झाला नसल्याचे वास्तव आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा/खामगाव: जिल्ह्यात अनेक शिकस्त आणि धोकादायक इमारती उभ्या असतानाही काही पालिका प्रशासनाकडून सर्व्हेच झाला नसल्याचे वास्तव आहे, तर खामगाव शहरातील विविध भागात ४० पेक्षा अधिक इमारती धोकादायक आहेत. राज्यात धोकादायक इमारतींमुळे वाढणाऱ्या दुर्घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील धोकादायक इमारतींचे काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
गत काही वर्षांमध्ये खामगाव शहराचा विस्तार वाढला आहे. दरम्यान, शहरातील १६ प्रभागांच्या तुलनेत बाजारपेठ आणि पुरातन वस्ती असलेल्या प्रभाग क्रमांक ६ मध्ये शिकस्त आणि धोकादायक इमारतींची संख्या अधिक आहे. त्याचप्रमाणे शिवाजी वेस, सनी पॅलेस, नटराज गार्डन, गांधी चौक, फरशी, सुटाळपुरा टिळक पुतळा या भागातही शिकस्त इमारती आहेत. यापैकी बहुतांश शिकस्त इमारती या निर्जन आहेत; मात्र बाजारपेठेतील काही इमारतीत अद्यापही रहिवासी आहेत. काही दिवसांपूर्वीच महावीर चौकातील एका इमारतीचा काही भाग कोसळून अपघात घडला होता. या पार्श्वभूमीवर नगर पालिका प्रशासनाने शहराच्या विविध भागातील धोकादायक इमारतींचे सर्वेक्षण सुरू केले; मात्र गत काही दिवसांपासून सुरू करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात खोडा पडला आहे. त्यामुळे शिकस्त इमारतींचे सर्वेक्षण रखडल्याची माहिती समोर येत आहे.
स्ट्रक्चरल आॅडिटच नाही!
बुलडाणा जिल्ह्याच्या ठिकाणच्या अनेक महत्त्वाच्या शासकीय कार्यालयांचा कारभार शिकस्त इमारतींमध्ये चालतो. शहरातील मुख्य बाजारपेठेतही अनेक इमारती धोकादायक आहेत; पण बुलडाणा पालिकेकडून स्ट्रक्चरल आॅडिटच होत नसल्याचा मुद्दा समोर आला आहे.
ब्रिटिशकालीन इमारतींमध्ये कारभार
जिल्ह्यातील अनेक शासकीय कार्यालयांचा कारभार आजही ब्रिटिशकालीन इमारतींमध्ये सुरू आहे. बुलडाणा येथील पाटबंधारे विभागाचे कार्यालयही अत्यंत जुनाट इमारतीमध्ये थाटलेले आहे.
बुलडाणा शहरातील शिकस्त इमारती, विना परवाना बांधकाम स्ट्रक्चरल आॅडिट झालेले नाही. या वर्षभरात ९७ बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे.
- वाय. जी. देशमुख,
कनिष्ठ अभियंता नगरपालिका, बुलडाणा.
खामगावातील शिकस्त आणि धोकादायक इमारतींची माहिती संकलीत करण्यात येत आहे. या इमारतीचे सर्वेक्षण पूर्ण होताच पुढील कारवाई केली जाईल.
- पंकज काकड
नगर रचना सहायक
नगर परिषद, खामगाव.