मोफत प्रवेशासाठी जागेपेक्षा अर्ज जास्त
By admin | Published: June 30, 2017 12:29 AM2017-06-30T00:29:16+5:302017-06-30T00:29:16+5:30
१५ हजार ५६ विद्यार्थ्यांचे अर्ज : अर्जदारांचे ड्रॉ बाकीच!
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: आरटीई अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेसाठी पश्चिम विदर्भात १० हजार ८०६ जागा असून, त्यासाठी १५ हजार ५६ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते; मात्र मोफत प्रवेशासाठी जागेपक्षा अर्ज जास्त आलेले असतानाही व शाळा सुरू होऊनही अद्यापपर्यंत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ड्रॉची प्रक्रिया बाकीच आहे.
शिक्षण हक्क कायद्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील २५ टक्के विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश देण्याचे बंधन खासगी शाळांना घालून देण्यात आले आहे. सन २०१७-१८ या शैक्षणिक वर्षात २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रियेचा लाभ घेण्याकरिता आॅनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया फेब्रुवारीमध्ये राबविण्यात आली; परंतु शाळा सुरू होऊनही ही प्रक्रिया अपूर्णच आहे. अमरावती विभागामध्ये १० हजार ८०६ जागेसाठी आरटीई अंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेशाची प्रक्रिया राबविण्यात येत असून, याचा लाभ घेण्यासाठी अमरावती विभागातील पाच जिल्ह्यातून १५ हजार ५६ विद्यार्थ्यांचे अर्ज आले. त्यानंतर शिक्षण विभागाकडून जिल्हास्तरावर ड्रॉ पद्धतीने विद्यार्थ्यांच्या प्रवेश पक्रिया राबविण्यात आली; मात्र मोफत प्रवेशासाठी विद्यार्थ्यांचे ड्रॉ काढण्याची प्रक्रिया अद्याप बाकी आहे. २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रियेमध्ये विविध अडचणी येत असल्याने अनेक प्रवेश अद्यापही बाकी आहेत. मोफत प्रवेशासाठी अमरावती विभागातून १५ हजार ५६ अर्ज आले आहेत. त्यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातून २ हजार २८५ अर्ज, अकोला जिल्ह्यात ३ हजार ४६७ , अमरावती जिल्ह्यात ५ हजार ३६०, वाशिम जिल्ह्यात ७५१ व यवतमाळ जिल्ह्यात ३ हजार १९३ अर्ज आलेले आहेत. २७ जूनला शाळा सुरू झाल्या आहे.
बुलडाणा जिल्ह्यात केवळ दोनच ड्रॉ
आरटीईअंतर्गत २५ टक्के मोफत प्रवेश प्रक्रिया राबविण्यासाठी बुलडाणा जिल्ह्यात आतापर्यंत केवळ दोनच वेळेस ड्रॉ काढण्यात आले; परंतु इतर जिल्ह्यांमध्ये पाच ते सहा वेळेस ड्रॉ काढून मोफत प्रवेशाचा मार्ग मोकळा करण्यात आला; मात्र बुलडाणा जिल्ह्यात प्रवेश प्रक्रिया अपूर्ण असूनही ड्रॉ काढण्याकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.