बुलडाणा जिल्ह्यातील अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2020 11:16 AM2020-08-24T11:16:09+5:302020-08-24T11:17:06+5:30
कोरोनाच्या भितीने ग्राहकांनी रेस्टॉरंटकडे पाठ फिरविल्याने अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.
- ब्रम्हानंद जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमध्ये जिल्ह्यातील सर्व हॉटेल बंद ठेवण्यात आले होते. आता शिथिलता मिळाल्यापासून रेस्टॉरंट सुरू करण्यात आले आहे. मात्र कोरोनाच्या भितीने ग्राहकांनी रेस्टॉरंटकडे पाठ फिरविल्याने अर्ध्यापेक्षा अधिक रेस्टॉरंट बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. सध्या केवळ पार्सल सेवा सुरू असून, त्यातही ६० टक्क्याने विक्री घटली आहे.
कोरोनामुळे चार महिन्यानंतर हॉटेल, रेस्टॉरंट सुरू ठेवण्यास मुभा मिळालेली आहे. परंतू केवळ पार्सल सेवाच देण्याचे बंधन आहे. कोरोना विषाणू संसर्गामुळे रेस्टॉरंट व्यावसायीकांच्या लाखोंच्या उलाढालीवर परिणाम झाला आहे. रेस्टॉरंट सुरू झाल्यानंतरही ग्राहकांचा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र जिल्ह्यातील रेस्टॉरंटमध्ये दिसून येते. सण, उत्सवाच्या काळातही बाहेरचे मिठाई व इतर पदार्थ खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कल दिसून येत नाही.
पूर्वी १५ हजार रुपये गल्ला आता एक हजार रुपये मिळणेही झाले कठीण
अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी शासनाने छोट्या-मोठ्या व्यवसायांना परवानगी दिली. त्यात रेस्टॉरंट आणि मिठाईविक्रीच्या दुकानांचाही समावेश आहे. मात्र करोना संसर्गाच्या भीतीमुळे अनेक पालक मुलांना बाहेरचे पदार्थ खाऊ देत नसल्याने त्याचा फटका रेस्टॉरंट व्यवसायाला बसल्याची खंत काही व्यावसायीकांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. पूर्वी दिवसाला १५ ते २० हजार रुपये गल्ला येणाऱ्या रेस्टॉरंटमध्ये आता केवळ ७०० ते ८०० रुपये येत असल्याची माहिती एका व्यावसायिकाने दिली.
७० लिटर चहाच्या ठिकाणी आता सहा लिटर चहाची विक्री
कोरोना येण्यापूर्वी बुलडाण्यातील एका रेस्टॉरंटमध्ये दिवसाला ७० लिटर चहाची विक्री होत होती. त्याच ठिकाणी सध्या केवळ सहा लिटर चहाची विक्री दिवसाकाठी होत आहे. रेस्टॉरंटमध्ये बसून चहा पिण्यास मनाई असल्याने, ही चहा विक्री कामगार बाहेर फिरून करत आहेत. परंतू त्यालाही प्रतिसाद मिळत नाही.
सण-उत्सव, धार्मिक कार्यक्रमांसाठी मोठ्या प्रमाणात मिठाईची विक्री होते; मात्र आता कोरोनाच्या भीतीने मिठाई विक्री होत नाही. उन्हाळ्यात विक्री केल्या जाणारा मालही मुदत संपल्या कारणाने फेकुन दिला. सध्या केवळ पार्सल सेवा सुरू करण्यास परवानगी दिली आहे. तरीसुद्धा ६० टक्के विक्री कमी झालेली आहे. शासनाने अटी शिथील करणे आवश्यक आहे.
- भारत शेळके, रेस्टॉरंट मालक, बुलडाणा.