वन्यप्राण्यांच्या मांसाची सर्रास विक्री
By admin | Published: July 14, 2014 11:07 PM2014-07-14T23:07:29+5:302014-07-14T23:07:29+5:30
पाणी मिळत नसल्याने जीव वाचविण्याच्या आकांताने भटकणार्या हरीण, मोर, घोरपड, लाहोरी, तितर, ससे, रानडुक्कर आदी प्राण्यांची सर्रास शिकार केल्या जात आहे.
पिंपळगाव राजा : तालुक्यात अन्न व पाण्यासाठी वन्यप्राणी सैरावैरा होऊन मानव वस्त्यांकडे धाव घेत आहेत. जंगलामध्ये अन्न व पाणी मिळत नसल्याने जीव वाचविण्याच्या आकांताने भटकणार्या हरीण, मोर, घोरपड, लाहोरी, तितर, ससे, रानडुक्कर आदी प्राण्यांची सर्रास शिकार केल्या जात आहे. तर त्यांच्या मांसाची ग्रामीण व शहरी भागात सर्रास विक्री होत आहे.
हा सर्व प्रकार उघड्या डोळ्यांनी पाहून देखील वनविभाग, वन्य प्राणी संरक्षण विभाग तसेच पोलिस प्रशासनाचे अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांच्या शिकार करणार्या टोळ्या सक्रीय झाल्या आहेत. पावसाळा लांबणीवर गेल्याने ग्रामीण भागात रोजगाराचा प्रश्न निर्माण झाल्याने वन्यप्राण्यांच्या शिकारीचा व्यवसाय तेजीत आला आहे. बोकड, कोंबडा, मच्छी यांच्या मांसाच्या किंमती वाढल्यामुळे शौकिन ग्राहक जिभेचे चोचले पुरविण्यासाठी वन्यप्राणी अत्यंत तोकड्या किंमतीत विकत घेत आहेत. वन्यप्राणी कमी किंमतीत मिळत असल्याने काही ढाबा, हॉटेलमालकांनी मर्जीतील विश्वासू ग्राहकांसाठी दुर्र्मीळ वन्य प्राण्यांच्या मांसाची मेजवाणी छुप्यामार्गाने देत आहेत. त्यामुळे त्यांच्या व्यवसायात पाचपटीने वृध्दी झाली आहे. वनविभागाचे कर्मचारी, पोलिस, शासकीय अधिकारी, पुढारी, सामाजिक कार्यकर्ते व इतर सर्वपक्षीय कार्यकर्ते ठिकठिकाणी वन्यप्राण्यांच्या मांसाचे भोजनाचा येथेच्छ आस्वाद घेतांना दिसून येतात. या लोकांना सामाजिक बांधिलकी किंवा निसर्गाविषयी, पशु-प्राण्यांविषयी प्रेम उफाळून येत नाही.
राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोरांच्या पिसांना चांगली किंमत येत असल्याने मोठय़ा प्रमाणात मोरांची तस्करी केल्या जात आहे. वनविभाग व पोलिस प्रशासनाच्या बेजबाबदार वागण्यामुळे परिसरातील राष्ट्रीय पक्षी मोर तसेच इतर पक्षाचे आणि वन्यप्राण्यांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. या प्राण्यांच्या शिकारीमुळे निसर्गाचा समतोल ढासळत आहे. पैशाच्या मोहामुळे पक्षी व दुर्मिळ प्राण्यांची हत्या होत आहे. या सर्व प्रकाराला आळा घालण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकार्यांना व कर्मचार्यांना दोषी ठरवून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची गरज आहे , अशी मागणी परिसरातील वन्यपक्षी व वन्यप्राणीप्रेमींकडून केल्या जात आहे.