मोताळा : ट्रॅक्टरच्या धडकेत १२ गंभीर; मिरवणुकीतील घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 02:26 AM2018-02-20T02:26:24+5:302018-02-20T02:26:51+5:30
मोताळा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक स्थानिक बसस्थानक चौकात आली असता मिरवणुकीत असलेल्या ट्रॅक्टरचे ब्रेक न लागल्याने झालेल्या अपघातात धडकेमुळे मिरवणुकीतील १२ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ फेब्रुवारी दुपारी घडली. या अपघातात १0 बालकांचा समावेश असून, सर्व जखमींवर बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
मोताळा: छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त काढण्यात आलेली मिरवणूक स्थानिक बसस्थानक चौकात आली असता मिरवणुकीत असलेल्या ट्रॅक्टरचे ब्रेक न लागल्याने झालेल्या अपघातात धडकेमुळे मिरवणुकीतील १२ जण गंभीर जखमी झाल्याची घटना १९ फेब्रुवारी दुपारी घडली. या अपघातात १0 बालकांचा समावेश असून, सर्व जखमींवर बुलडाणा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मोताळा येथील छत्रपती आखाड्याच्यावतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३८८ व्या जयंतीनिमित्त सोमवारी दुपारी मिरवणूक काढण्यात आली होती. मिरवणूक स्थानिक बसस्थानक चौकात आली असता मिरवणुकीत वापरलेल्या ट्रॅक्टरचे ब्रेक न लागल्याने झालेल्या अपघातात ट्रॅक्टरच्या धडकेत मिरवणुकीतील सहभागी १0 बालकांसह १२ जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यात रवींद्र चुडामन चंद्रशिव (३0), दीपक ज्योतीराम बोदडे (४0), नयन शिवाजी लवगे (६), रुपेश विनोद आढाव (१0), राहुल विठ्ठल शंकपाल (१३), प्रथमेश शरद देशमुख (१५), प्रथमेश विजय शेळके (१५), अनिकेत भागवत मापारी (१३), धीरज श्रीकृष्ण वावगे (१२), अनिकेत भगवान मापारी (१३), ओम विक्रम तोमर (१३), ओम प्रकाश देशमुख (१२) यांचा समावेश आहे. यावेळी उपस्थितांनी जखमींना त्वरित मोताळा येथील डॉ. महाजन यांच्या रुग्णालयात व तेथून गंभीर जखमींना बुलडाणा येथे हलविण्यात आले. लद्धड हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहे. धीरज श्रीकृष्ण वावगे, अनिकेत भगवान मापारी, ओम विक्रम तोमर, ओम प्रकाश देशमुख यांच्यावरही बुलडाण्यात उपचार करण्यात येत असून, एका गंभीर जखमीला औरंगाबादला हलविले आहे.
घडले माणुसकीचे दर्शन
यावेळी घटनास्थळी ट्रॅक्टरचे ब्रेक न लागल्यामुळे अनेकांनी ट्रॅक्टरसमोर उभे राहून ट्रॅक्टर थांबविण्याचा प्रयत्न केला. तर काहींनी जखमी बालकांना खांद्यावर उचलत डॉ. महाजन यांच्या रुग्णालयात हलविले. यावेळी ट्रॅक्टर थांबविण्याच्या प्रयत्नात नगरसेवक नीना इंगळे यांनी ट्रॅक्टरच्या ब्रेकवर उभे राहून ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या पायाला आणि उपस्थित अन्य नागरिकांच्या हाताला गंभीर दुखापत झाली; मात्र त्यांनी केलेल्या प्रयत्नामुळे मोठी दुर्घटना टळली असून, माणुसकीचे दर्शन घडविले.