मोताळा वनपरिक्षेत्र कार्यालयाला मिळाले सहा फायर ब्लोअर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:57 AM2021-05-05T04:57:04+5:302021-05-05T04:57:04+5:30
वाढत्या तापमानामुळे वन विभागाच्या हद्दीत आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट ...
वाढत्या तापमानामुळे वन विभागाच्या हद्दीत आग लागण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणात वनसंपदा नष्ट होऊन पर्यावरणाची हानी होत आहे. तापमानात वाढ झाली असल्याने छोट्या-छोट्या प्रमाणात लागलेली आगही काही क्षणातच रौद्ररूप धारण करून जंगलात वणवा पेटतो. अशावेळी आग आटोक्यात आणण्यासाठी वन कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागते. तरीही आग आटोक्यात येत नाही. कोठे पाणी कमी पडते, तर कोठे मनुष्यबळ कमी पडते. अलीकडे मोताळा वन विभागाच्या हद्दीत आग लागायच्या घटना घडल्या होत्या; परंतु वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी वेळीच प्रसंगावधान राखून आगीवर नियंत्रण मिळवले होते. सतत आगीच्या घटना लक्षात घेता येथील वनपरिक्षेत्र कार्यालयाकडून फायर ब्लोअरची मागणी केली होती. वरिष्ठांनी या मागणीची दखल घेऊन तत्काळ वनपरिक्षेत्र कार्यालयास सहा फायर ब्लोअर उपलब्ध करून दिले. भविष्यात वन विभागाच्या हद्दीत लागणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी हे फायर ब्लोअर उपयुक्त ठरणार असून आग विझविण्यासाठी याची मोठ्या प्रमाणात मदत मिळणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी नेहा मुरकुटे यांनी सांगितले आहे.