आई राधा, उदो-उदो
By Admin | Published: October 25, 2016 02:58 AM2016-10-25T02:58:02+5:302016-10-25T02:58:02+5:30
खामगावातील जगदंबा माता उत्सवाची मुर्ती विसर्जनाने सांगता.
खामगाव, दि. २४- आई राधा उदो-उदो च्या गजरात भाविकांनी जगदंबा मातेला भावपूर्ण निरोप देत रात्री शहरानजीकच्या घाटपुरी येथील बोर्डी नदीपात्रात विसर्जन करण्यात आले.
गत १५ ऑक्टोबर कोजागिरी पौर्णिमेपासून शहरात तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात जगदंबा मातेच्या मूर्तीची स्थापना करण्यात आली होती. सोमवारी या उत्सवाचा समारोप झाला. यानिमित्त शहरातून मिरवणूक काढण्यात आली. दुपारी १ वाजता मोठी देवीची आरती झाल्यानंतर या मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीच्या अग्रभागी मोठी देवी होती. त्यानंतर इतर मंडळांचा सहभाग होता. अकोला बाजार मार्गे गांधी चौक, महावीर चौक, जलालपुरा, भुसावळ चौक, सतीफैल, बर्डे प्लॉट, निर्मल टर्निंग, केडिया टर्निर्ंग, महावीर चौक, मोहन चौक, फरशी, सावरकर चौक, पुरवार गल्ली, शिवाजी वेस, दंडेस्वामी मंदिर, घाटपुरी नाका या मार्गे मिरवणूक रात्री १0 वाजेपर्यंत घाटपुरी येथील बोर्डी नदी येथे पोहोचली.
त्यानंतर मोठी देवीचे विसर्जन करण्यात आले, तर शहरातील काही मंडळांनी आपल्या सोयीने आपआपल्या भागातून मिरवणूक काढली. रात्री उशिरापर्यंत घाटपुरी येथील बोर्डी नदीपात्रात मातेच्या मूर्तीचे विसर्जन पार पडले. मिरवणुकीत हळद व कुंकवाची उधळण करण्यात आली. मातेसोबतच भाविकांनी हळदी-कुंकवाचा मरवट भरला होता. मोठी देवी मंडळासमोरील परडीवाल्यांचे पथक या मिरवणुकीतील आकर्षण ठरले.